बरेचदा आपण नाश्त्याला इडली, डोसा, मेदू वडा असे साऊथ इंडियन पदार्थ अगदी आवडीने खातो. हे पदार्थ खाताना त्याची लज्जत अजूनच वाढवायची असेल तर मस्त झणझणीत सांबार तर पाहिजेच. सांबार शिवाय इडली, डोसा, मेदू वडा असे साऊथ इंडियन पदार्थ अपूर्णच आहेत. मस्त खमंग फोडणी दिलेलं सांबार आणि खोबऱ्याची चटणी याशिवाय साऊथ इंडियन पदार्थ खाणे व्यर्थ आहे. सांबार सर्वत्र भारतात पसंत केली जाणारी दक्षिण भारतीय डिश आहे. कुठल्याही उडपी हॉटेलमधील सांबाराची चव चाखल्यावर असे सांबार जर आपल्याला घरी बनवता आले तर, असा विचार मनात येऊन जातो(How to make sambar premix).
परफेक्ट उडपी स्टाईलने सांबार करायचे म्हटलं की सगळे मसाले भाज्या अशी सगळी जय्यत तयारी असते. परंतु बरेचदा आपल्याला सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ केले तर सांबार करायला तितकासा वेळ नसतो. अशावेळी आपण वर्षभर टिकणारे सांबार प्रिमिक्स घरच्याघरी एकदाच तयार करुन ठेवू शकतो. या सांबार प्रिमिक्स पावडरचा वापर करुन आपण परफेक्ट उडपी स्टाईल सांबार अगदी ५ मिनिटांत तयार करु शकतो. सांबार प्रिमिक्स तयार करण्याची सोपी रेसिपी पाहुयात(How to make Instant Sambar at Home in Just 10 min with Instant Sambar Premix).
साहित्य :-
१. तूर डाळ - १ कप (धुवून वाळवून घेतलेली)
२. चणा डाळ - १ कप
३. धणे - १/२ कप
४. काश्मिरी लाल मिरची - ६ ते ८ सुक्या लाल मिरच्या
५. मेथी दाणे - १ टेबलस्पून
६. चिंच - ५० ग्रॅम (बिया काढून घेतलेल्या)
७. कडीपत्ता - १० ते १२ पाने
८. मोहरी - १ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. काळे मीठ - १/२ टेबलस्पून
११. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१२. हिंग - १ टेबलस्पून
१३. हळद - १ टेबलस्पून
१४. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून
पारंपरिक बेने डोसा फक्त १० मिनिटांत करण्याची पाहा भन्नाट कृती, पारंपरिक साऊथ इंडियन डोसा...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये तुरीची डाळ घेऊन ती ३ ते ४ वेळा पाण्याचे स्वच्छ धुवून घ्यावी. डाळ स्वच्छ धुतल्यानंतर ती संपूर्णपणे सुके पर्यंत व्यवस्थित वाळवून घ्यावी. डाळ वाळवून झाल्यानंतर पॅन मध्ये ही डाळ कोरडीच भाजून घ्यावी. डाळीचा हलका सुगंध येईपर्यंत डाळ भाजून घ्यावी. त्यानंतर ही डाळ एका डिशमध्ये काढून घ्यावी. आता त्याच पॅनमध्ये अनुक्रमे चणा डाळ, धणे, लाल मिरच्या, मेथी दाणे, बिया काढून घेतलेली चिंच असे सगळे जिन्नस एक एक करून कोरडे भाजून घ्यावे. त्यानंतर कडीपत्ता व मोहरी देखील वेगवेगळे भाजून घ्यावेत आणि हे दोन्ही जिन्नस एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवावेत.
२. आता हे सगळे जिन्नस एका मोठ्या डिशमध्ये काढून एकत्रित करावेत. हे मिश्रण आता थोडे गार होऊ द्यावे. आता मिक्सरच्या भांड्यात हे सगळे जिन्नस एकत्रित करून त्याची बारीक पूड करून घ्यावी. ही बारीक पूड करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हिंग, हळद, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, काळे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्यावा.
३. आता मिक्सरच्या भांड्यातून ही प्रिमिक्स पावडर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी. बाऊलमध्ये प्रिमिक्स पावडर काढून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात भाजून घेतलेली मोहरी व कडीपत्त्याची पाने घालूंन प्रिमिक्स पावडर चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावी. सांबार प्रिमिक्स पावडर तयार आहे. ही सांबार प्रिमिक्स पावडर एका काचेच्या हवाबंद बाटलीत व्यवस्थित स्टोअर करुन ठेवावी.
फिल्टर नाही घरी, डोन्ट वरी! फिल्टर न वापरता ५ मिनिटांत करा फेसाळती फिल्टर कॉफी...
या प्रिमिक्स पावडर पासून सांबार कसे तयार करायचे ?
१. एका भांड्यात तेल घेऊन त्यात टोमॅटो, कांदा, शेवग्याच्या शेंगा, बटाटा किंवा आपल्या आवडत्या भाज्या तेलावर हलक्याशा परतून घ्याव्यात.
२. एका बाऊलमध्ये ही होममेड सांबार प्रिमिक्स पावडर घेऊन त्यात कपभर गरम पाणी ओतावे, आणि चमच्याच्या मदतीने ढवळून त्याची थोडं घट्टसर पेस्ट तयार करून घ्यावी.
३. सगळ्या भाज्या तेलावर हलक्या परतून घेताना त्यात थोडेसे पाणी घालून भाज्यांना एक वाफ येऊ दयावी. भाज्या वाफवून झाल्यानंतर त्यात तयार केलेली सांबार प्रिमिक्स पावडरची पेस्ट घालून घ्यावी. आता सांबार चमच्याने ढवळून घ्यावे आणि एक उकळी येऊ द्यावी.
मदुराई स्पेशल ‘थन्नी चटणी’ खाऊन तर पाहा, इडली-डोसा लागेल मस्त-चमचमीत चटणीची रेसिपी...
होममेड सांबार प्रिमिक्स पावडरचा वापर करुन अगदी परफेक्ट तयार झालेले सांबार खाण्यासाठी तयार आहे.