'चहा' हे असे पेय आहे की आपण ते कधीही आणि कुठेही पिऊ शकतो. बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. सकाळचा गरमागरम वाफाळता चहा जोपर्यंत पीत नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात झाली आहे असे वाटतच नाही. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंत गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच असते. धो -धो कोसळणारा (Ready To Drink Tea - Just Add Hot Water, Travel Friendly Recipe) पाऊस आणि गुलाबी थंडी पडली की सर्वात आधी आपल्याला चहाची आठवण येते. पावसाळ्यात वाफाळत्या चहाचा कप आणि सोबत कुरकुरीत गरम भजी हा बेत नक्की ठरलेलाच असतो(Chai Tea Premix Powder Recipe).
पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडून आजूबाजूला वातावरणात गारवा पसरला की चहाची तलप लागते. कित्येकदा पावसाळ्यात गॅसवर चहा करण्यासाठी ठेवलेलं भांड खाली उतरवलंच जात नाही, इतका चहा आवडीने प्यायला जातो. पावसाळ्यात वारंवार येणारी चहाची तलप भागवण्यासाठी आता सारखा चहा करत बसायची गरज नाही. आपण चहाचे प्रिमिक्स एकदाच तयार करुन ठेवू शकतो. या प्रिमिक्समध्ये फक्त गरम पाणी घातलं की फक्कड असा चहा तयार.... आपल्याला वारंवार चहा करत बसायला लागू नये किंवा बाहेर कुठे प्रवासात जाताना आपण हे चहाचे प्रिमिक्स वापरुन झटपट इन्स्टंट पद्धतीने चहा करु शकतो.चहा प्रिमिक्स नेमके कसे तयार करावे ते पाहूयात(Homemade Instant Tea Premix).
साहित्य :-
१. वेलची - १ टेबलस्पून
२. बडीशेप - १ टेबलस्पून
३. लवंग - १ टेबलस्पून
४. काळीमिरी - १ टेबलस्पून
५. दालचिनी - १ टेबलस्पून
६. चहा पावडर - १ कप
७. साखर - १ कप
८. सुंठ पावडर - १ टेबलस्पून
९. जायफळ पूड - चिमूटभर
१०. मिल्क पावडर - १ कप
कृती :-
१. एक मोठा पॅन घेऊन त्यात वेलची, बडीशेप, लवंग, काळीमिरी, दालचिनी घालून गॅसच्या मंद आचेवर हे सगळे जिन्नस कोरडे भाजून घ्यावेत.
२. त्यानंतर हे सगळे भाजून घेतलेले जिन्नस थोडे थंड होऊ द्यावेत.
३. चहा पावडर आणि हे सगळे जिन्नस थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यावेत. मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस वाटून त्याची बारीक पूड करुन घ्यावी.
४. त्यानंतर त्यात साखर, सुंठ पावडर, जायफळ पूड घालून परत एकदा मिक्सरमधील सगळे जिन्नस वाटून घ्या.
५. सगळ्यात शेवटी या मिक्सरच्या भांड्यात मिल्क पावडर घालून पुन्हा एकदा मिक्सरमधील सगळे जिन्नस एकत्रित वाटून त्याची बारीक पूड बनवून घ्यावी.
६. आता मिक्सरमधील ही बारीक पूड चाळणीतून चाळून घ्यावी. त्यानंतर ही चाळून घेतलेली पूड एका काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करुन ठेवावी.
कॉफी प्यायल्याने छातीत जळजळ होते? लक्षात ठेवा ४ गोष्टी, अॅसिडीटी होईल कमी...
प्रिमिक्स वापरुन चहा कसा करावा ?
१. हे प्रिमिक्स वापरुन चहा तयार करण्यासाठी एका कपमध्ये आधी १ टेबलस्पून प्रिमिक्स घ्यावे.
२. त्यानंतर त्यात कपभर गरम पाणी ओतून घ्यावे आणि चमच्याने ढवळून हे प्रिमिक्स त्यात मिक्स करावे.
३. प्रिमिक्स वापरुन तयार केलेला आपला गरमागरम चहा पिण्यासाठी तयार आहे.