उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक घरांमध्ये पापड करायला सुरूवात होते. उन्हाळा हा ऋतू पापड, कुरडया, वड्या, सांगडे बनवण्यासाठी उत्तम मानला जातो. कडकडीत उन्हात सुकवलेले पापड वर्षानुवर्ष टिकतात आणि चवीलाही उत्तम असतात. जेवताना तोंडी लावणीसाठी पापड असतील दोन घास जेवण जास्त जातं. (Wheat flour Papad Recipe How to make Aata papad)
घरी पापड बनवायचे म्हणजे खूपच वेळ जातो, तासनतास पापड लाटत बसावे लागतात म्हणून बऱ्याचजणी पापड घरी बनवणं टाळतात. तुम्ही नाचणीचे, तांदळाचे पापड खूपदा खाल्ले असतील. पण गव्हाच्या पीठाचे पापडही तितकेच चवदार आणि खायला कुरकुरीत असतात. न लाटता न पीठ भिजवता गव्हाचे पापड कसे बनवायचे ते पाहूया. (Instant Whole Wheat Papad recipe)
गव्हाचे पापड कसे बनवायचे?
हे पापड बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ वाट्या चपातीचं पीठ घ्या. पापडांचा मसाला बनवण्यासाठी एका वाटीत जीरं, मिरच्या, आलं घ्या. मिरच्यांचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एका लहानश्या मिक्सरच्या भांड्यात हे साहित्य काढून घ्या. एक ते दोन चमचे पाणी वापरून बारीक पेस्ट तयार करून घ्या. याशिवाय दोन ते तीन चमचे पांढरे तीळ, १ चमचा ओवा, १ चमचा पापडखार आणि चवीनुसार मीठ लागेल.
गॅसवर मोठं भांड ठेवा. ज्या भांड्यानं पीठ मोजलं त्याच भांड्यानं 7 वेळा पाणी भांड्यात घाला. पाणी गरम झालं की त्यात मिरच्यांची पेस्ट घाला त्यानंतर ओवा, पापडखार, पांढऱ्या तिळाचं मिश्रण घाला. यात २ टिस्पून तेल घालून उकळी काढून घ्या. २ ते ३ मिनिटात पाण्याला उकळी येईल. नंतर गव्हाचं पीठ यात घाला आणि लाकडाच्या चमच्यानं किंवा लाटण्यानं हे पीठ एकजीव करा. ही प्रक्रिया पटापट करावी लागेल अन्यथा पीठाच्या गुठळ्या होतात. व्यवस्थित एकजीव झालं की चमच्याला लागलेलं पीठ काढून घ्या. नंतर भांड्यावर ५ ते ६ मिनिटांसाठी झाकण ठेवा. एक ते दीड मिनिटांनी हे झाकण उघडून पाहत राहा.
रवा-बेसनाचा सॉफ्ट स्पॅान्जी ढोकळा फक्त १० मिनिटांत, चवीला बेस्ट आणि पोटालाही चांगला...
नंतर गॅस बंद करून पीठ बाहेर काढा आणि प्लास्टीकचा पेपर लावून पीठ एकजीव करून घ्या. पीठ व्यवस्थित मळल्यानंतर त्याचे गोळे करा आणि पापड लाटून घ्या. तुम्हाला पापड लाटायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पुरी बनवण्याच्या मशिनमध्ये पापड बनवू शकता. समान आकाराचे पापड करून सुकवायला ठेवा. २ ते ३ दिवस कडक उन्हात हे पापड सुकवल्यानंतर कधीही तळून किंवा भाजून खाऊ शकता.