मेघना सामंत
कॉफीचा शोध माणसाला कसा लागला याबद्दल अनेक दंतकथा आहेत. त्यातली एक गोष्ट तशी सगळ्यांना माहित असते. इथियोपियातल्या एका मेंढपाळाला काही बकऱ्या नेहमीच्या झोपायच्या वेळी टणटण उड्या मारताना आढळल्या. नवल वाटून तो त्या बकऱ्यांनी काय खाल्लं हे बघायला गेला आणि एका रोपापर्यंत पोचला. त्या रोपाची फळं त्याने स्थानिक धर्मगुरूला दाखवली. त्याने त्या फळांपासून एक पेय बनवलं. तीच कॉफी.
(Image : Google)
या कथेपेक्षाही विलक्षण आहे तो या पेयाचा आणि कॉफी रोपांचा प्रवास. इथियोपियातून हे पेय अरबस्तानात, तिथून दीडदोन शतकांनी युरोपात पोचलं. याआधी सकाळच्या न्याहारीसोबत लोक वाइन किंवा बीयर पीत. लवकरच कॉफीने हे स्थान घेतलं (चहा जनप्रिय व्हायच्या आधीची गोष्ट). सतराव्या शतकाच्या मध्यास युरोपात कॉफीची लोकप्रियता शिगेला पोचली. कॉफी हाउसेसची नांदी झाली ती तेव्हाच. पण मेंदूला तरतरी आणण्याच्या तिच्या गुणामुळे वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या काळात टीकाकारांनी कॉफीवर 'सैतानाचं पेय' असा शिक्का मारला आणि कॉफी पिण्यावर, लागवडीवर बंदी आणली. पण कॉफीभक्तांना अधिक चेव चढला. या संपूर्ण काळात कॉफीबियांच्या तस्करीचे, गुप्त देवाणघेवाणीचे जे खटाटोप झाले त्यांच्या नवलकथा हा वाचनीय ऐवज.
इकडे भारतात कॉफी आणली ती ब्रिटिशांनी असं मानतात पण त्याहीपूर्वी मुघल सम्राटांना या पेयांची अद्भुत चव माहित होती हे निश्चित. कारण अकबरपुत्र जहांगीरच्या दरबारातल्या एका कवीने कॉफी उकळण्याच्या भांड्यावर कविता रचलेली आहे. अर्थात तेव्हा कॉफी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसावी बहुतेक. दंतकथा अशी की इ.स. १७२०च्या सुमारास हजयात्रेला गेलेल्या बाबा बुदान नावाच्या फकिराने थेट मक्केवरून कॉफीच्या सात बिया आणल्या आणि आपल्या गुंफेसमोर पेरल्या.
ही गुंफा होती कुठे? कर्नाटकातल्या चिकमंगळूर गावच्या एका टेकडीवर.
(Image : Google)
कथा खरी असो-नसो, वस्तुस्थिती अशी की कॉफीची मायदेशातली वाढती मागणी पुरी करण्यासाठी त्या प्रमाणात कॉफीचे मळे हवेत; म्हणून धूर्त अरबी, युरोपियन व्यावसायिकांनी श्रीलंका वगैरे देशांमध्ये आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. त्यामुळे दक्षिणेत कॉफी पसरत गेली- पेय म्हणून, पीक म्हणूनही. आज दक्षिण भारतातल्या ठिकठिकाणच्या बागांमधली खास चवीची कॉफी प्रसिद्ध आहे. जगभरात कॉफीवर विपुल साहित्य लिहिलं गेलंय, कॉफी म्युझियम्स आहेत, अट्टल कॉफीबाजांचे क्लब्ज आहेत, कॅफेज् तर आहेतच.
तीनशे वर्षांत कॉफी ही एक संस्कृती बनली आहे.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)