Lokmat Sakhi >Food > International Tea Day : चहात बर्फ कुणी टाकला? ‘आइस्ड टी’चा शोध कसा लागला?

International Tea Day : चहात बर्फ कुणी टाकला? ‘आइस्ड टी’चा शोध कसा लागला?

चहाला बाकी काही चव असो नसो तो निदान गरम तरी पाहिजे, पण मग चहात बर्फ टाकून गारेगार आइस टी प्यायची आयडिया कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 03:08 PM2022-05-21T15:08:53+5:302022-05-21T15:11:56+5:30

चहाला बाकी काही चव असो नसो तो निदान गरम तरी पाहिजे, पण मग चहात बर्फ टाकून गारेगार आइस टी प्यायची आयडिया कुणाची?

International Tea Day: Who put ice in tea? How did iced tea come about? | International Tea Day : चहात बर्फ कुणी टाकला? ‘आइस्ड टी’चा शोध कसा लागला?

International Tea Day : चहात बर्फ कुणी टाकला? ‘आइस्ड टी’चा शोध कसा लागला?

Highlightsसर्वत्र, विशेषतः अमेरिकेत आइस्ड टी आवडीने प्यायला जातो.

मेघना सामंत


चहात दूध-साखर घालून प्यायला सुरुवात झाली. पण याशिवायही अनेकविध घटक चहात घातले जातात. लोणी (तेही याकच्या दुधाचं), मीठ घालून भरपूर घुसळलेल्या दाट, शक्तिवर्धक तिबेटी चहापासून ते उकळत्या पाण्यात जाणवेल न जाणवेल इतकीच मंद सुगंधी पत्ती घातलेल्या नाजुक जपानी चहापर्यंत चहाचे असंख्य बहारदार प्रकार आणि तितक्याच बहारदार चहापान परंपरा गेल्या तीनचारशे वर्षांत देशोदेशी निर्माण झाल्या. पण या सर्वांत एक बाब समान होती- आहे.. चहाचा कढतपणा. गरम नसेल तर तो चहाच नव्हे असं मानणारे लोक असताना अचानक एक टूम निघाली आइस्ड टी ऊर्फ बर्फाळ चहाची. कशी काय बुवा? कथा रंजक आहे.
उत्तर अमेरिकेतल्या मिसूरी प्रांतात, सेंट लुईस या शहरी १९०४ साली एक जागतिक दर्जाचं प्रदर्शन भरलं. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानातले नवनवे शोध, नवी उत्पादनं ‘याचि डोळा’ पाहायला मिळणार असल्याने ३० एप्रिल या पहिल्याच दिवशी प्रदर्शनाच्या ठिकाणी अक्षरशः लाखोंची गर्दी लोटली. रिचर्ड ब्लेकिंडेन हा चहामळ्यांचा मालक आपला स्टॉल थाटून बसला होता. आपल्या मळ्यातल्या चहापत्तीचे नमुने येणाऱ्याजाणाऱ्यांना वाटत होता. लहानलहान कपांमधून चहाची चव बघण्याचा आग्रह करत होता. परंतु कडाक्याच्या उन्हाळ्यात, घुसमटवणाऱ्या गर्दीत तो गरमगरम चहा कोणालाच नको होता. ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे वैतागलेल्या ब्लेकिंडेनने शेवटचा उपाय म्हणून चहाचा अर्क बर्फाच्या खड्यांवर ओतला आणि क्षणात चित्र पालटलं. एका नव्या अनोख्या पेयाचा जन्म झाला. तो गारेगार चहा पिण्यासाठी एकच झुंबड उडाली.

(Image : Google)

थंडगार सरबतासारखा चहा पेश करण्याचे काही तुरळक प्रयोग त्याआधी झाले होते म्हणा, पण ब्लेकिंडेनच्या ‘आइस्ड टी’ला जी लोकप्रियता लाभली ती अभूतपूर्व. पुढे लिंबू, पुदिना, मध इत्यादींच्या संगतीने हा चहा मस्त तरतरीत बनला. कोल्डड्रिंक पिण्याचं समाधान देणारा पण त्याच्यापेक्षा कितीतरी आरोग्यदायी म्हणून जगात सर्वत्र, विशेषतः अमेरिकेत आइस्ड टी आवडीने प्यायला जातो. भारतात मात्र त्याला फारसा लोकाश्रय नाही. कडकडीत उन्हाळ्यातही आपण तितकाच उष्ण चहा रिचवतो आणि ‘लोहा लोहे को काटता है’ म्हणत खुशीत हसतो.


(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: International Tea Day: Who put ice in tea? How did iced tea come about?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न