मेघना सामंत
अस्सल चहाबाज दुधाशिवायच्या चहाकडे उपेक्षेनेच पाहतो. ब्लॅक टी, ग्रीन टी प्यायची फ्याशन हल्लीहल्लीची हो, दूध-साखर घातल्याशिवाय का कुणी चहा पितं? चहा चीनमधून आला वगैरे माहिती सगळ्यांनाच असते. पण तिकडे त्यात दूध नाही घालत. मग चहात दूध घालायची ही आयडिया कुणाची?
सतराव्या शतकातला ब्रिटिश युवराज चार्ल्स दुसरा याचं लग्न झालं पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रॅगांझा हिच्याशी. या लग्नाचा हुंडा आपल्या दृष्टीने फारच महत्त्वाचा. एक तर भारतातलं बॉम्बे नावाचं दलदलीने भरलेलं बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना हुंड्यात दिलं. शिवाय लग्नातल्या भेटवस्तूंमध्ये ब्रिटिश राजघराण्याला मिळाली एका अनोख्या, अमूल्य पदार्थाने भरलेली पेटी. चहापत्ती. उभ्या इंग्लंडमध्ये त्यापूर्वी कुणी चहाचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं, पिण्याची गोष्ट सोडा. नववधू कॅथरीन मात्र भलतीच चहावेडी होती. हळूहळू तिने उच्चभ्रू वर्तुळाला चहाची आवड लावली. तो कोराच असे.
(Image : Google)
युरोपात सर्व आर्थिक वर्गातले लोक चहाने खुळावले. पण तो महाग होता त्या काळात. त्यात काहीतरी भरीला घालावं म्हणून पॅरिसमधल्या पार्टी-लव्हिंग वर्गाने मलईदार दूध (ते स्वस्त होतं) घातलं. युरोपियन व्यापाऱ्यांनी तिबेटमधल्या लोकांना चहात लोणी मिसळून पिताना पाहिलं होतं. त्यावरून ही कल्पना स्फुरली म्हणे.
आणखीही मजेदार कहाण्या आहेत. चहाचा द्राव कडवट झाला म्हणून सौम्य करण्यासाठी; कधी निकृष्ट दर्जाच्या चहापत्तीचा उग्र स्वाद लपवण्यासाठी दुधाचा वापर झाला; चहाचे कप महागड्या पोर्सिलेनचे असत, त्यात उकळता चहा ओतला तर कप फुटायची भीती, म्हणून आधी कोमट दूध ओतून तापमान आटोक्यात आणलं जाई.. असे एक ना अनेक तर्क.
एक कारणमीमांसा तर अजब आहे. इंग्लंडमधल्या कामगारवर्गाला दुपारची चहाची सुट्टी असे. कोरा, कडकडीत चहा दिला तर माणसं हळूहळू घुटके घेत वेळ काढत बसत. पण दूध मिसळून किंचित निवलेला चहा दिला तर एका दमात तो संपवून आपापल्या कामावर हजर होत. वेळ वाचावा म्हणून मालकवर्गाने लढवलेली शक्कल. असो. कोणत्याही कारणाने का होईना, चहात दूध घालण्याची प्रथा युरोपात स्थिरावली आणि इकडे आपल्याला एक पावरबाज पेय मिळालं एवढं खरं.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)