Lokmat Sakhi >Food > ज्वारी-नाचणी-बाजरी, भरड डाएटची नवी कहाणी! मिलेट्सचा आहारात समावेश नेमका कसा कराल?

ज्वारी-नाचणी-बाजरी, भरड डाएटची नवी कहाणी! मिलेट्सचा आहारात समावेश नेमका कसा कराल?

भरडधान्यांची चर्चा फार, मात्र नव्यानं ते आहारात स्वीकारताना नेमके काय करायचे? काय टाळायचे? (International year of millets 2023)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2023 03:31 PM2023-02-07T15:31:56+5:302023-02-07T15:34:18+5:30

भरडधान्यांची चर्चा फार, मात्र नव्यानं ते आहारात स्वीकारताना नेमके काय करायचे? काय टाळायचे? (International year of millets 2023)

international year of millets 2023 : why Millets are important in diet, how to use it and recipe | ज्वारी-नाचणी-बाजरी, भरड डाएटची नवी कहाणी! मिलेट्सचा आहारात समावेश नेमका कसा कराल?

ज्वारी-नाचणी-बाजरी, भरड डाएटची नवी कहाणी! मिलेट्सचा आहारात समावेश नेमका कसा कराल?

Highlightsज्वारी-बाजरी-नाचणी, नवी डाएट ‘भरड’ कहाणी

अर्चना रायरीकर

सध्या आपण जिकडे-तिकडे ‘भरडधान्य’ हा शब्द ऐकत आहोत. हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. आपल्या देशात आणि अन्नसंस्कृतीत मात्र भरडधान्यांचा वापर नवा नाही. सुमारे सात हजार वर्षांपासून ही भरड धान्य आपल्या संस्कृतीचा भाग आहे असे सांगितले जाते. मध्यंतरी उत्खननामध्ये या भरड धान्यापासून बनवलेले लाडू सापडले होते जे हजारो वर्षांपूर्वी बनवले गेले होते. तसेच आपल्या वेदांमध्येदेखील भरड धान्यांचा उल्लेख आढळून येतो. ही पौष्टिक भरडधान्य अगदी पुरातन काळापासून आपल्या आहाराचा भाग होती. मात्र, मधल्या काही काळामध्ये ती जणू लुप्त झाली होती. आता परत नव्याने भारतालाच नव्हे, तर जगाला भरडधान्यांची ओळख पटू लागलेली आहे. आरोग्यासाठी भरडधान्यांचे आहारातले महत्त्वही कळू लागले आहे. किमान आता त्याची चर्चा आहे.
जगभरातच नव्हे, तर आपल्या देशात जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार, कुपोषण, शरीरात असलेली विविध जीवनसत्वांची कमतरता, तसेच कमी रोगप्रतिकार शक्ती या सगळ्या गोष्टींचे कारण म्हणजे आपल्या आहारातील पोषक तत्त्वांचा दर्जा घसरला आहे.
एकीकडे पोषक दर्जा कमी झालेला आहे आणि दुसरीकडे रिफाइंड केलेले, पॉलिश केलेले, प्रक्रिया केलेले, रासायनिक पदार्थ यांचा आहारामध्ये भरणा वाढत चालला आहे. याशिवाय प्रदूषण, वातावरणात होणारे बदल, पाण्याची कमतरता यामुळे धान्यउत्पादनाचे प्रश्न आहेत. कमी पाण्यात उत्तम येणारी पिकं म्हणूनही भरडधान्य महत्त्वाची आहेत. कमीत कमी रसायनं वापरून आणि कमी पाण्यात त्यांचं उत्पादन शक्य आहे. आपल्या शरीराच्या पोषणासाठीच नाही, तर आपल्या शेतीसाठीही भरडधान्य महत्त्वाची आहेत.

(Image : google)

मात्र, भरडधान्यासंदर्भात अलीकडे होत असलेली चर्चा वाचून अनेकांना बरेच प्रश्न पडतात. आम्ही आमच्या पेशंटला भरडधान्याबद्दल काही सांगतो तेव्हा त्यांची काही इंग्रजी नावे ऐकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते की, हे आता काय नवीन? त्यांना वाटते की, आहारतज्ज्ञ काहीतरी विदेशी, फॅन्सी, महागडे खायला सांगत आहेत.
खरी गंमत तर हीच आहे की, पटवून द्यावे लागते की हे मिलेट्स, अर्थात भरडधान्य आपल्याच मातीतली आहे. स्थानिक आहाराचाच भाग आहे.
परंतु त्यांना जेव्हा मी सांगते की, आपलीच आहे, आपल्या मातीतली आहे तेव्हा त्यांना खरोखर याचे नवल वाटते. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, मिलेट्स किंवा भरडधान्याचा आपल्याला विसर पडला, ते आपल्या आहारात अत्यंत कमी आहेत किंवा नाहीतच. अर्थ असा नाही की, आता आपण गहू, तांदूळ बंद करायला हवेत, याचा अर्थ असा आहे की, आपण समजुतीने भरडधान्यांना आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश द्यायला हवा. नव्या काळात तर ऑनलाइन त्यांच्या अनेक पाककृतीही सहज मिळू शकतात.


(Image : google)

 

भरडधान्य म्हणजे कोणती धान्य?


भरडधान्य, मिलेट्स म्हणजे ज्वारी, नाचणी, बाजरी, लहान बाजरी. उदा. कुटकी, कोडो, सावा अशी धान्यं. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून त्यांना ‘पौष्टिक तृणधान्य’ किंवा न्यूट्री-सीरियल म्हटले जाते. भारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.


भरडधान्यच का?

१. भरडधान्यात भरपूर प्रमाणामध्ये तंतुमय घटक असतात.
२. तंतुमय पदार्थामुळे मिलेट्समधील कर्बोदकांचे अभिशोषण म्हणजेच ॲबसाॅर्बशन अगदी हळू होते. म्हणजे त्यांचा ग्ल्यासेमिक इंडेक्स खूप कमी असतो.
३. त्यांचा उपयोग आपल्याला अनेक गोष्टींसाठी होऊ शकतो. एक तर यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करायला मदत होते. रक्तातील ग्लुकोज पटकन वाढत नाही आणि त्यामुळे आपल्या मधुमेह नियंत्रणात राहायला याची मदत होते .
४. कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लीसराईडदेखील कमी करायला मदत होते.
५. जीवनशैलीशी संबंधित असणाऱ्या अनेक आजारांवर आहार औषध म्हणून त्यांचा उपयोग होतो. पोट साफ राहायला मदत होते आणि त्यामुळे पचनासाठीदेखील ते खूप उत्तम आहेत.
६. ज्यांना गव्हातील ग्लूटेनची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी मिलेट्स हा उत्तम पर्याय आहे.


(Image : google)

पदार्थ कोणते?

१. भाकरी, थालीपीठ, डोसा, इडली हे पोटभरीचे पर्याय आहेत.
२. हल्ली भरड धान्याचा रवादेखील बाजारात मिळतो. त्याचा उपमा छान होतो.
३. भरडधान्य पिठाचे लाडू, बिस्किटे.


किती खावे?

आपल्या राेजच्या आहारात माफक प्रमाणात ते असावेत. आपल्या आहारात जेवढी विविधता तेवढं आपल्याला विविध पोषक घटक जास्त मिळतात. भरडधान्य अत्यंत पोषक असल्यामुळे सर्व वयोगटासाठी, सर्व शारीरिक अवस्थांमध्ये आणि आजारांमध्येदेखील ते आहारात असणे चांगले.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)
archanarairikar@gmail.com

Web Title: international year of millets 2023 : why Millets are important in diet, how to use it and recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न