Join us  

तुम्हीही थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? हे आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2023 9:51 AM

Is It Healthy To Do Fulke or Bhakri On Gas Directly Without Tawa : तज्ज्ञ सांगतात यातील तथ्य...

पोळी, भाकरी, फुलके हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक. अनेकदा घाईच्या वेळीही आपण नाश्त्याला चहा-पोळी खाऊन जातो. दुपारच्या जेवणात तर आवर्जून पोळी किंवा भाकरी खातो. अनेकांच्या घरी पोळ्यांच्या ऐवजी फुलके केले जातात. फुलके पचायला हलके तर असतातच पण ते खाल्ल्याने कमी गहू पोटात जातो आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अनेक जण नियमितपणे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीही खातात. पचायला ज्वारी हलकी असल्याने ग्रामीण भागात आजही भाकरी खाण्याची पद्धत आहे. फुलके किंवा भाकरी करायची म्हणजे ती एका बाजुने तव्यावर आणि एका बाजुने गॅसवर भाजली जाते (Is It Healthy To Do Fulke or Bhakri On Gas Directly Without Tawa). 

(Image : Google)

गॅसवर भाकरी किंवा फुलके थेट भाजले तर त्यातून येणाऱ्या रासायनिक पदार्थांचा यावर परीणाम होतो असे म्हणतात. या स्वरुपाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसत आहेत. एलपीजी गॅसमधून जे रासायनिक पदार्थ बाहेर येतात त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते असा दावा या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र याबाबत मराठी विज्ञान परीषदेचे माजी अध्यक्ष विनय र.र यांना विचारले असता या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरीकांनी अजिबात काळजी करु नये असेही त्यांनी सांगितले. 

(Image : Google)

काही वेळा गॅस सुरू केला आणि तो पेटवला नाही तर त्याचा वास येतो. मात्र तो पेटवल्यानंतर ऑक्सिडाईज होऊन तो वास निघून जातो. त्यामुळे थेट गॅसवर फुलके किंवा भाकरी भाजली तर काहीच हरकत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर काही मिसगाईड करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करायला हवे. दिवसागणिक अशा असंख्य गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आरोग्याच्या गोष्टीबाबत आपण थोडे गांभिर्याने घेतो. मात्र योग्य ती खातरजमा केल्याशिवाय अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य