ऋतूनुसार आपल्या आहारात बदल करणं आवश्यक असतं. उन्हाळ्यात आपण जास्त पाणी पितो आणि शरीराला एनर्जी देतील असे पदार्थ खातो. तर थंडीच्या दिवसांत भकू वाढल्याने नकळत आपला आहारही वाढतो. पावसाळ्यातही गरम आणि हलका आहार घेणे चांगले असते. शरीराचे पोषण होण्यासाठी भाज्या आणि फळे आहारात मुबलक प्रमाणात असायला हवीत. हे जरी खरं असलं तरी पावसाळ्यात पालेभाजी खाणं आरोग्यासाठी कितपत चांगलं असतं? असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतो. पालेभाजीतून आपल्याला भरपूर जीवनसत्त्व, खनिजे आणि इतरही अनेक घटक मिळतात, त्यामुळे आहारात पालेभाजीचे प्रमाण चांगले असायला हवे असे आपण वारंवार ऐकतो. हे जरी खरे असले तरी पावसाळ्याच्या दिवसांत पालेभाजी खावी का? किती प्रमाणात खावी? त्या स्वच्छ करण्याची पद्धत काय असावी? जास्त पालेभाज्या खाल्ल्या तर आपल्याला आरोग्याच्या कोणत्या तक्रारी उद्भवतात याविषयी समजून घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पालेभाजी खाताना काय काळजी घ्यावी याविषयी..
१. खरेदी करताना
पावसाळ्यात पालेभाजी कमी प्रमाणात खायला हवी. या काळात भाज्या ओल्या आणि दमट असण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे भाजी फार ओली नाही ना ते पाहून घ्यावे. अनेकदा पावसाळ्यात भाजीत जास्त चिखल असण्याची शक्यता असते. तेव्हा भाजी खरेदी करताना त्याकडेही नीट लक्ष द्यायला हवे.
२. किटाणू जास्त असण्याची शक्यता
उन्हाळा आणि हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात वातावरण जास्त दमट असते. त्यामुळे विषाणूंची वाढ होण्यासाठी हे वातावरण अतिशय पोषक असते. उन्हाळ्यात कडक उन्हामुळे लहान किडे किंवा विषाणू मरुन जाण्याची शक्यता असते. पण पावसाळ्यात हे विषाणू न मरता त्यांची वाढ होते. त्यामुळे भाजी खरेदी करताना, निवडताना, धुताना आणि करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. नाहीतर पोट खराब होण्याची शक्यता असते.
३. साफ करताना लक्षात ठेवा
पालेभाजीची पानं जेव्हा जास्त तुटलेली असतात तेव्हा किड्यांनी ती पाने खायला सुरुवात केलेली असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे किड काढून टाकण्याबरोबरच खराब झालेली पानंही काढून टाकायला हवीत. पालेभाज्या धुताना थोडे गरम पाणी वापरल्यास त्यातले विषाणू मरण्यास मदत होते. याशिवाय पालेभाज्या काही वेळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवल्या तरी त्यातील किड निघून जाण्यास मदत होते.