लसूण सोलणे, कांदा सोलून चिरणे, आल्याची माती साफ करुन, जास्त खराब असेल तर त्याची साले काढणे ही कामे वेळ घेणारी असतात. घाईच्या वेळी एखादा पदार्थ पटकन करायचा असेल आणि ही तयारी नसेल तर सुरुवातीपासून सगळे करायचा आपल्याला कंटाळा येतो. मग आपण घाईघाईत कसेतरी करतो किंवा वेगळाच पदार्थ करणे पसंत करतो. हल्ली बाजारात सोललेला लसूण मिळतो, मात्र त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. तुमचे नियोजन कितीही चांगले असले, सुट्टीच्या दिवशी तुम्ही आलं साफ करुन, लसूण सोलून ठेवलेला असला तरी ऐनवेळी तो संपला तर मात्र खूप वेळ जातो. लसूण बारीक असेल तर तो सोलणे आणखी एक जिकरीचे काम असते. त्याच्या पाकळ्या करुन त्या प्रत्येक पाकळीची साले काढण्यात बराच वेळ जातो. अशावेळी लसूण सोलण्याची एखादी सोपी युक्ती (Kitchen Hacks) किंवा आलं साफ करण्याची, कांद्याची साले काढण्याची युक्ती आपल्याला माहित असेल तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. पाहूयात स्वयंपाकघरातील अशाच काही सोप्या टिप्स (Cooking Tips) ज्यामुळे आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा तर येणार नाहीच पण आपण त्याचा आनंद घेऊ शकू.
लसूण सोलण्याच्या सोप्या पद्धती पाहूया...
१. वेगवेगळ्या भाज्यांच्या वाटणासाठी, अगदी एखाद्या पालेभाजीला किंवा आमटीला फोडणी देण्यासाठी आणि चटणीसाठीही आपल्याला नियमीतपणे लसूण लागतो. लसूण सोलण्यासाठीचा वेळ वाटवायचा असेल तर काही सोप्या ट्रीक्स आहेत. मायक्रोव्हेवमध्ये लसणाच्या सालासकट असलेल्या पाकळ्या गरम करुन घ्यायच्या. २० सेकंद या पाकळ्या मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यानंतर त्या बाहेर काढाव्यात. त्यानंतर त्याची साले अगदी सहज निघून येण्यास मदत होते.
२. एखादी बाटली किंवा शेकर आपल्या घरात सहज उपलब्ध असतो. लसूण पुढच्या बाजुने सुरीने चिरुन घ्यावा. त्यामुळे त्याचा तोंडाकडील काढायला कठिण जाणारा भाग आधीच निघतो. त्यानंतर शेकरमध्ये घातलेल्या पाकळ्या जोरजोरात हलवाव्यात. यामुळे त्याची हलकी झालेली साले निघण्यास मदत होते.
३. ही अतिशय पारंपरिक पद्धत असून ठराविक वेळेला जितक्या पाकळ्या लागतात तितक्याच घेऊन त्या हाताने किंवा एखाद्या वाटीने जोर देऊन दाबाव्यात. त्यामुळे त्यांची साले निघण्यास मदत होते. दाब पडल्यामुळे ही साले हलकी होतात आणि निघणे सोपे जाते. कमी लसूण लागत असेल तर ठिक आहे पण जास्त प्रमाणात लसूण लागत असल्यास ही पद्धत म्हणावी तितकी उपयोगी नाही.
रडवणारा कांदा चिरण्याची सोपी पद्धत...
कांदा हा अनेक पदार्थांसाठी लागतोच. कधी चौकोनी तर कधी उभा चिरलेला कधी एखाद्या पदार्थावर घेण्यासाठी एकदम बारीक चिरलेला असे कांदा चिरण्याचे अनेक प्रकार आहेत. जवळपास प्रत्येक जेवणात कांदा खाणारे लोक आपल्या आजुबाजूला असतात. केवळ वाटणातच नाही तर फ्राय केलेला कांदा, एखाद्या भाजीला भर म्हणून तर कधी कच्चा खाण्यासाठी असे कांदा चिरण्याचे अनेक प्रकार आहेत. त्याची साले काढणे, पुढचे आणि मागचे कापणे, मग तो चिरणे अशा त्यात बऱ्याच गोष्टी असतात. तर कांद्याची साले काढल्यानंतर तो काही काळ फ्रिजरमध्ये ठेवावा. याला आणखी एक पर्याय म्हणजे १५ मिनीटे साले काढलेला कांदा पाण्यात ठेवावा. यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही आणि त्याचा उग्र वासही कमी होतो.
आलं साफ करण्याची सोपी पद्धत
आल्याला अनेक लहान मोठे कर्व्ह असल्याने त्यातील माती काढणे, आल्याचे साल काढणे हे एक जिकरीचे काम असते. सालकाढीनेही ही साले नीट काढता येत नाहीत. आली तरी बरेचसे आले वाया जाण्याची शक्यता असते. यातील माती किंवा इतर घाण पोटात गेली तर काहीवेळा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी एखादा थोडा शार्प कडा असलेला चमचा घेऊन त्याने आले सोलावे. त्यामुळे आले साफ करणे आणि वापरणे सोपे होऊ शकते.