Join us  

Jaggery benefits : काळा अन् पिवळ्या गुळातील फरक कसा ओळखायचा? गूळ विकत घेताना गोंधळताय? जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 4:15 PM

Jaggery benefits : पिवळा गूळ आणि काळा गूळ यात अनेकजण गोंधळतात.  कोणत्या पदार्थासाठी कसा गुळ वापरायला हवा. त्याचे फायदे तोटे काय हे समजून घ्या.

ठळक मुद्देगुळ खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे जेवण झाल्यावर गुळाचा लहानसा खडा नेहमी चघळावा, असं सांगितलं जातं.

सणासुदीला घरात गुळ असावाच लागतो. लाडू, करंजी, पूरणपोळी, खीर यात गुळाचा वापर हमखास केला जातो. पण लाडवांसाठी किंवा रोजच्या स्वयंपाकासाठी गुळ खरेदी करताना अनेकदा आपली फसवणूक होते.  काही प्रकारच्या लाडूंमध्ये साधा गूळ घातल्यास लाडू उत्तम बनतात. पण जर चुकून त्यात चिक्कीचा गूळ घातला तर पदार्थ हवा तसा बनत नाही. पिवळा गूळ आणि काळा गूळ यात अनेकजण गोंधळतात.  कोणत्या पदार्थासाठी कसा गुळ वापरायला हवा. त्याचे फायदे तोटे काय हे समजून घेऊया. 

पिवळा गुळ

शहरी  भागात अनेक ठिकाणी मिळणारा गुळ हा पिवळ्या रंगाचा एखाद्या चॉकलेटप्रमाणे असतो. पिवळ्या गुळावर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे या गुळामधील अनेक पोषकतत्वे कमी झालेली असतात. त्यामुळे गुळापासून मिळणारा फायदा हा पूर्णपणे मिळत नाही.

अशा गुळाच्या अधिक सेवनामुळे काही त्रासही होण्याची शक्यता असते.  तुम्ही असा गुळ पदार्थांमध्ये वापरत असाल तर त्याचं प्रमाण जास्त असू नये.  पिवळ्या गुळामध्ये सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट यांचे प्रमाण अधिक असते. कॅल्शियम कार्बोनेटमुळे गुळाचे वजन वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त लोक असा गूळ विकत घेतात. 

काळा गुळ

जर तुम्ही शुद्ध स्वरुपातील उसाचा रस प्यायला असेल तर तुमच्या लक्षात येईल की उसाचा रस हा कधीच पिवळ्या रंगाचा नसतो. तर उसाचा रस हा कायम थोडासा काळा असतो. काळा रस हा उत्तम आणि खरा मानला जातो. म्हणूनच त्या पद्धतीनं तयार केलेला गुळ हा चांगला आणि सेंद्रीय असल्याचं मानलं जातं. काळा गुळ हा जास्त गोड असतो अनेकदा पदार्थात याचा वापर केल्यानं पदार्थ जास्त काळपट दिसू लागतो म्हणून काहीजण या गुळाचा वापर टाळतात. तर काहीजण नेहमीच या गुळाचा वापर करतात. या गुळाचे तुकडे करणं सोपं होतं. मेथीचे, डिंकाचे, मुगाचे लाडू चविष्ट बनण्यासाठी अनेकदा या गुळाच्या पाकाचा वापर केला जातो.

गुळाच्या सेवनाचे फायदे

१)  रोज गुळ शेंगदाणे किंवा चण्यांसोबत गुळाचे सेवन केल्यानं शरीरातील रक्तीचा कमतरता भरून निघण्यास मदत होते. विशेषत: अॅनिमियाचा त्रास असलेल्यांनी गुळाचे सेवन करायलाच हवं. 

२) गुळ खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे जेवण झाल्यावर गुळाचा लहानसा खडा नेहमी चघळावा, असं सांगितलं जातं.

३) गुळामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांचे हिमोग्लोबिन कायम कमी असते. लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी गुळाचे सेवन नियमित केले पाहिजे. गुळामध्ये कॅल्शियमदेखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी दररोज थोडा तरी गुळ खावा.

४)  गुळाचे सेवन शरीराला उर्जा देणारे असते. गुळ खाल्ल्यानं रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे गुळ खायला हवा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य