आपल्याकडील खाद्य संस्कृतीमध्ये अतिशय समृद्धता आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. ते पदार्थ म्हणजे त्या सणाची ओळख असावी, इतके ते पदार्थ आणि सण एकजीव झालेले असतात. आता हेच बघा ना जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बहुतांश घरांमध्ये हमखास पंजिरी केली जाते. तुम्हालाही यंदा श्रीकृष्णासाठी पंजिरी करायची असेल, तर बघा पंजिरी तयार करण्याच्या २ खास रेसिपी
१. कणकेपासून केलेली पंजिरी
साहित्य
एक कप गव्हाचे पीठ, अर्धा कप गूळाची पावडर, पाव कप तूप, २ टीस्पून वेलची पावडर, ७ ते ८ तुळशीची पाने, तुमच्या आवडीचा सुकामेवा पाव कप, थोडंसं सुकं खोबरं, पाव कप मखाना.
गोकुळाष्टमी: पितळ आणि चांदीची मुर्ती चमकवण्याचे २ उपाय- फक्त काही मिनिटांत बाळकृष्णाची मुर्ती दिसेल चकाचक
रेसिपी
- गॅसवर कढई तापत ठेवा. त्यात तूप टाका.
- तूप तापलं की त्यात गव्हाचे पीठ टाका आणि ते मंद आचेवर तपकिरी रंगांचे होईपर्यंत परतून घ्या. पीठ परतून घेताना खाली कढईला लागणार नाही, याची काळजी घ्या.
- आता त्यात सुकामेवा टाका आणि सगळे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्या. सुकामेवा परतून झाला की गॅस बंद करून टाका आणि हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
- थंड झाल्यावर त्यात गूळ घाला.
- त्यानंतर वेलची पावडर टाका. सगळे मिश्रण हलवून घ्या आणि वरतून तुळशीची पानं टाका. नैवेद्याची पंजिरी झाली तयार.
२. धणे पंजिरी
साहित्य
अर्धा कप मखाना, अर्धा कप धणे पावडर, अर्धा कप पिठीसाखर, पाव कप खोबऱ्याचा किस, ३ टेबलस्पून तूप, बदाम, काजू, खरबूज बी, मनुका असा सगळा सुकामेवा पाव कप, वेलची पूड २ टी स्पून
रेसिपी
- कढई गॅसवर तापत ठेवा. कढई तापली की त्यात खोबऱ्याचा किस टाकून परतून घ्या आणि तो एका प्लेटमध्ये काढून घ्या.
गोकुळाष्टमी: नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ पदार्थ, आवडत्या कान्हासाठी खास बेत
- आता कढईत तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात मखाने टाकून फ्राय करा. गॅस मंद ठेवावा. परतून झाले की ते एका बाऊलमध्ये काढून घ्या.
- काजू- बदाम- मनुका परतून घ्या आणि कढईतून बाजूला काढून ठेवा.
- आता पुन्हा तूप टाका, त्यात धणे पावडर टाकून २ ते ३ मिनिटे भाजून घ्या. यानंतर त्यात सुकामेवा, नारळाचा किस असं सगळंच टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. एखादा मिनिट परतून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
- हे मिश्रण जेव्हा थंड होईल, तेव्हाच त्यात साखर टाका आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. धने पंजिरी झाली तयार.
पंजिरी खाण्याचे फायदे
१. पंजिरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, फायबर भरपूर प्रमाणात असतात.
२. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पंजिरी उपयुक्त ठरते.
३. बाळंतपणात शरीराची झालेली झीज भरून येण्यासाठी अनेक महिलांना पंजिरी खाण्याचा सल्ला दिला जातो.
४. शरीरात इन्सुलिनचा स्त्राव वाढून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी धने पंजिरीचा विशेष उपयोग होतो.
५. हृदयाच्या आरोग्यासाठीही धने पंजिरी खाणे फायदेशीर मानले जाते.