Join us  

घरच्या घरी बनवा आंबट-गोड चवीची जीरा गोळी; जिऱ्याचे ५ फायदे, घ्या परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2023 4:33 PM

Jeera Goli Cumin Seed goli Recipe : बाजारात मिळणारी ही जीरा गोळी कमीत कमी पदार्थांमध्ये घरीही झटपट करता येते.

जिरं म्हटल्यावर आपल्याला तडचडणारं आणि आपण फोडणीत घालतो ते जीरं आठवतं. पदार्थाचा स्वाद वाढवणारा मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ. एखाद्या पदार्थाला फक्त जीरं आणि हिंगाची फोडणी देऊन त्याचा स्वाद वाढवला जातो. तर कधी ताक, दही-बुंदी यांच्यावर घालण्यासाठी आपण आवर्जून जीऱ्याची पूड वापरतो. पण केवळ मसाला म्हणूनच जिऱ्याचा वापर केला जात नाही. तर आरोग्याच्या कित्येक तक्रारींसाठी जीऱ्याचा आहारात समावेश करण्यास सांगण्यात येतो. आता जीरं आपण पदार्थांमध्ये तर खातोच पण पाचक म्हणून असलेल्या जिऱ्याची गोळीही आपण लहानपणी कधीतरी खाल्लेली असते. बाजारात मिळणारी ही जीरा गोळी कमीत कमी पदार्थांमध्ये घरीही करता येते. चटपटीत लागणारी आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेली ही गोळी कशी करायची पाहूया (Jeera Goli Recipe)...

साहित्य -

१. जीरं - ३ चमचे  

२. आमचूर पावडर - ४ चमचे 

३. काळे मीठ - १ चमचा 

४. पिठी साखर - ८ चमचे 

५. लिंबाचा रस - २ चमचे

कृती - 

१. गॅसवर कढई ठेवून त्यावर जीरं मंद आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं.

(Image : Google)

२. थोडं गार झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करायची. 

३. ती एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये आमचूर पावडर घालायची.

४. काळं मीठ आणि पिठीसाखर घालून हे मिश्रण चांगलं एकत्र करुन घ्यायचं. 

५. यामध्ये लिंबाचा रस घालायचा आणि हे मिश्रण पुन्हा हाताने एकजीव करायचे.

६. मग याचे लहान आकाराचे गोळे करुन घ्यायचे आणि ते पिठीसाखरेमध्ये घोळवून घ्यायचे.

७. या गोळ्या फॅनखाली किंवा उन्हात १.५ ते २ तासांसाठी वाळत ठेवायच्या. 

जीरागोळी खाण्याचे फायदे

१. जीऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने ती आरोग्यासाठी उपयुक्त असते.

२. बरेचदा आपल्याला पचनाच्या काही ना काही तक्रारी उद्भवतात. गॅसेस, अपचन, अॅसिडीटी यांसारख्या तक्रारींसाठी जीरा गोळी खाणे अतिशय उपयुक्त ठरते. 

३. सर्दी-तापामुळे तोंडाची चव गेली असेल तर या गोळीमुळे तोंडाला चव येण्यास मदत होते.

 

४. लठ्ठपणा, हृदयविकार, डायबिटीस यांसारख्या समस्यांवर जीरे खाणे हा रामबाण उपाय आहे. 

५. जिरे हे आयर्न आणि डाइट्री फायबरचा चांगला स्त्रोत आहेच. त्यामुळे इम्यून सिस्टिमची कार्यक्षमता टचांगली ठेवण्यास जिरे फायदेशीर आहे.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य