रोजचं आयुष्य कोमट वाटायला लागलं, तोंडाला चव नाही असं वाटलं की मिरचीचा झणझणीत ठेचा आठवतो. किंवा मग नुसती मिरची भाजून दही मिरची. एवढीशी मिरची, बारकुडीशी. पण तिखट किती. एकदम तोंडाची चव आणि हा हा करत जिभेचं रंगरुपच बदलून टाकते. हिरवी मिरची लाल होता होता तिची चव, वागणं, तिचा ठसका सगळं बदलतं. पावडर होता होता ती बदलते. कधी फोडणीत ठसका होते तर कधी वडापावसोबत तळलेली मिरची चटकदार लागते. जेवढ्या मिरच्या तेवढ्या तऱ्हा. रोजच्या स्वयंपाकात मिरची नसेल तर मग काही मजाच नाही जेवणात असं वाटतं..
पण ही मिरची भारतीय जेवणात अवघी काही शे वर्षांपूर्वी आली म्हणतात. आता तर भारत हा मिरचीचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे पण पाचशे वर्षांपूर्वी भारतीय जेवणात मिरची नव्हती असं भारतीय खाद्य इतिहासकार मानतात.
(Image : google)
असं म्हणतात की भारतीय स्वयंपाकाला पोर्तुगीजांनी मिरचीचा परिचय घडवला. (आता ते खरं तरी वाटेल का, इतकी आता मिरची आपल्या स्वयंपाकाचा अविभाज्य घटक झाली आहे.)
इंग्रज खरंतर मसाल्यांच्या त्यातही काळ्या मिरीच्या शोधात भारतात आले. त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहेच. पण तोवर भारतात हिरवी मिरची नव्हती.
तिकडे कोलंबसही मिरची शोधत होताच एकीकडे. त्या काळात भारतीय काळ्या मिरीचे भाव युरोपात खूप होते. व्यापारात पैसा होता.
त्यानंतर मग मिरची युरोपात पोहोचली आणि भारतातही. नुसती हिरवी मिरचीच नाही तर ढोबळ्या मिरच्याही आल्या. आता तर रंगीत ढोबळ्या मिरच्याही भरपूर दिसतात.
जगातली सर्वात तिखट मानली जाणारी भूत जोलोकिया मिरचीही भारतातल्या ईशान्य राज्यातच होते. आणि जेवणात जर ती असली तर नाकातोंडातून धूर निघालाच समजा.
(Image : Google)
तर अशी ही मिरचीची गोष्ट. आपल्या रोजच्या जेवणातली मिरची तिला असा इतिहास आणि भूगोलही आहे हे आपल्याला माहिती नसतं. पण मिरचीचं वैशिष्ट्य असं की ती कोणत्याच भूभागात अडकून पडत नाही. जिथं बी पडलं तिथं रुजते. अगदी तुमच्या घराच्या कुंडीतही बी टाकून पहा. हिरवी मिरचीचं रोप मूळ धरत सुंदर कोवळ्या हिरव्या मिरच्या नक्की लगडतील.