अंजना देवस्थळे
"गुलमोहर तो डोलता, स्वागत हे केवढे, त्या तिथे पलीकडे तिकडे...."मैत्रिणींच्या मैफिलीत माझ्या एका सखीने मधुर आवाजात हे सुरेल गीत गायलं आणि एक वाद सुरू झाला! गदिमांच्या गाण्यावरून वाद? झालं असं ,की त्यातली एक मैत्रीण पर्यावरण प्रेमी, ॲक्टिविस्टच म्हणा ना. तिचं म्हणणं की तुम्ही लोकांनी गुलमोहरसारख्या परकीय झाडांची असे गोड कौतुक करून पर्यावरणाची पार वाट लावून टाकली. परकीय झाडे लावून स्थानिक झाडांना डावलून टाकलं आहे. पशुपक्षी प्राण्यांचे अधिवास नष्ट केले. परकीय झाडांवर असे असंख्य आरोप ती करत होती. गाणारी मैत्रीण बिचारी, तिनेच हे सर्व घडवून आणल्यासारखे हिरमुसून बसली.
तेव्हा माझ्या मनात विचार आला, हे सर्व खरं आहे; पण आपल्या अन्नातली परकीय धान्य, भाज्या, फळं, तेल ज्या आपण आपल्याशा केल्या त्यांचं काय?आपल्या अन्नाचा आणि परकीय झाडांचा काय संबंध?आहे आहे, खूप आहे. आपल्याला न कळत आपल्या शेतांचा, ताटाचा ताबा अशा अनेक परकीय वनस्पतींनी घेतला आहे.अन्नाच्या या प्रवासाची गोष्ट फार रंजक आहे.
गोष्ट फार फार पूर्वीची. आपले शिकार करणारे, कंदमूळ खाणारे पूर्वज थोडे स्थिरावले, थोडीफार शेती करू लागले तरी ते भटके होते. नवीन प्रदेशात फिरताना त्यांच्यासोबत त्यांच्या प्रदेशातल्या बिया पुढे पुढे सरकत गेल्या आणि अन्नधान्याचा प्रवास हळूहळू होत गेला. पुढे आणखी प्रगती झाली. लहानसहान होड्या घेऊन साहसी लोक दर्या पार करत जाऊ लागले. असा जवळजवळच्या बेटांवर, समुद्रापार वनस्पतींचा प्रवास होत गेला.पुढे नद्यांच्या खोऱ्यात महान संस्कृती वसल्या. सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा, मोहेंजोदडो, मेसोपोटानिया, नाईल या सर्वांमध्ये संस्कृती आणि व्यापारासोबत धान्याचेही आदान-प्रदान होत असे. त्यातूनच गहू आपल्याकडे आला.सागरी वाऱ्यांची मनुष्याला गती कळली आणि नैऋत्य मान्सूनची साथ मिळाल्याने अरबस्थानातून जहाजं जून महिन्यात निघून सप्टेंबरपर्यंत आपल्या पश्चिम किनाऱ्याला घडकायची. इथे काही महिने राहून वाऱ्याची दिशा बदलली की परत. भारताच्या संपन्नतेची ख्याती सर्वदूर पसरली होती. कोलंबस भारताच्या शोधात निघाला आणि चुकल्या वाटेने वेस्ट इंडीजला पोहोचला.
या प्रवासाला खरी कलाटणी मिळाली पंधराव्या शतकात. युरोपचे राजे नवीन देश शोधण्यासाठी मोहिमा पाठवत होते. पोर्तुगालचा एक खलाशी व्यापाऱ्याचा वेश करून अरबी जहाजात शिरला आणि त्याने हा मार्ग टिपून ठेवला. त्याच मार्गाने वास्को द गामाने भारत गाठलं आणि भारतातल्या वनस्पतींचा प्रवास आणि भारताकडे वनस्पतींचा प्रवास सुरू झाला. भारतातून जहाज भरभरून सोनं नाणं, दागदागिने, कपडालत्ता तर गेलंच; पण त्याचबरोबर मसाले विशेषतः मिरी, लवंग, वेलची, हळद नेले जात. तिळाचे तेल, तांदूळ, साखर, ऊस अशा खाद्यवस्तूही गेल्या. बदल्यात पहिल्यांदा त्यांनी आणली मिरची, तीच मिरची जी आज आपल्या अन्नातल्या तिखटाचा मुख्य घटक झाली आहे.काना मागून आली आणि तिखट झाली हे खरंच.
पोर्तुगालचा राजा या सर्व संपत्तीवर फारच खुश झाला. त्याने कॅब्रेल नावाच्या एका खलाशाला तब्बल १५ जहाज, पंधराशे सैनिक आणि धर्मप्रसारासाठी आठ पाद्री घेऊन भारताकडे पाठवलं. समुद्राच्या वाऱ्याने त्याचीही दिशा चुकली आणि तो पोहोचला ब्राझीलला. ब्राझीलही जैवविविधतेने संपन्न. तिथल्या अनेक प्रकारच्या वनस्पतींची रोपं घेऊन तो पोर्तुगालला लावण्यासाठी घेऊन जाताना वाटेत त्याच्या काही बोटी नष्ट झाल्या आणि तो भारताच्या दिशेने आला. त्याने गोळा केलेले टापिओका, काजू, अननस, पपई, बटाटा, टॉमॅटो अशी अनेक कोमजलेली रोप लावण्याची राजाकडून परवानगी घेतली आणि पुढे काही काळानं साबुदाण्याची खिचडी, काजूकतली, पायनॅपल जॅम असे आपल्या अन्नात समाविष्ट झाले !पुढे इंग्रज आले, त्यांनी तर जगभरच्या वनस्पतींची पार खिचडीच करून टाकली. कधी व्यापारी दृष्टीने, तर काही संशोधन म्हणून तर कधी बागांचे सौंदर्य वाढवायला. इंग्रज सरकारने जगभरातून गोळा केलेली नवीन झाडं पहिल्यांदा कोलकात्याच्या बॉटनिकल गार्डनमध्ये लावली. तिथून मग ती सर्वत्र नेली जात असत. चिनी चहा आपल्या गळी उतरवला, मग त्याची चटक लावली. मग दार्जिलिंग, आसामची जंगले कापून तिथे चहाचे मळे तयार झाले. दक्षिणेत कॉफीच्या बागा तयार केल्या. बटाट्याचे ही तसंच, खरं तर बटाटा पोर्तुगीजांची भेट, पण त्याचा प्रचार आणि प्रसार इंग्रजांनी केला. कधी शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून, बक्षीस देऊन, नाही तर बळजबरी करून बटाट्याची शेती रुजवली. पुढे पुरी-भाजी, मसाला डोसा, बटाटा वडा प्रचलित झाला; पण सुरण, करांदे, घोडकांद, कोनकंदसारखी तमाम पौष्टिक कंदमुळं मात्र मागे पडली.सगळीच फळं काही पोर्तुगीज किंवा इंग्रजांनी आणली असं नाही. त्याआधी मुघलांनी अंगूर, खरबूज, जरदाळूसारखी फळं आणली. सर दिनशा नामक टेक्सटाइल व्यापारी मेक्सिकोला गेले असताना त्यांना एक गोड फळ खूप आवडले. त्यांनी ते मुंबईला आणले. इराणी नावाच्या त्यांच्या सहकार्याने ते डहाणूला लावलं. आपल्याकडे ते एवढे छान रुजले, वाढले की घोलवड भागाच्या फळ्यांना चक्क जीआय टॅगही मिळाला आणि तो भरभरून एक्सपोर्ट होतो, तर हे फळ म्हणजे, मेक्सिकोतून आणलेला चिकू.
भोपळी मिरची, फ्लावर, कोबी, सेलरी, पारसली अशा तमाम भाज्या सूर्यफुलाचे, सोयाबीनचे तेलपण परकियांचीच देणच बरं का!संत्रा, लिंबू जरी मुळात भारतीय असले तरी त्यांच्याच कुळातला मोजंबीकहून आलेली मोसंबी मात्र आपली नाही. तसाच दक्षिण अमेरिकेतला, स्पॅनिश भाषेतला पेरा म्हणजे आपला पेरू.असे अनेक स्थानिक नसलेले पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात घर करून बसले आहेत. मेक्सिकोचा अवोकॅडो, पेरूचा किनोवा, तिकडचीच चीया सीड्स आणि अशी असंख्य परकीय फळं, भाज्या, धान्य आपल्या घरात आणि पोटात शिरली. ‘वसुधैव कुटुंबकम’ असे हळूहळू होतंच आहे.
(लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)anjanahorticulture@gmail.com