Join us  

फक्त २ जिन्नस वापरुन करा ज्वारीचे गरमागरम, कुरकुरीत डोसे, झटपट होणारा पौष्टीक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 1:09 PM

Jowar Dosa Easy Healthy Recipe : कमीत कमी आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थात होणारा हा डोसा कसा करायचा ते पाहूया.

रोज नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला वेगळं काय करायचं असा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे असतो. दुपारच्या जेवणाला पोळी-भाजी, भात वरण, कोशिंबीर असं जेवण झालं की रात्री किंवा नाश्त्याला वेगळं काहीतरी हवं असतं. पोहे, उपमा खाऊन अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी डोसे हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा प्रकार. पावसाळ्याच्या दिवसांत तर असे गरमागरम डोसे खायला फारच छान वाटते. डोसे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर डाळ-तांदळाचा डोसा येतो. पण त्यापेक्षा थोडा वेगळा आणि जास्त पौष्टीक असा ज्वारीचा डोसा तुम्ही क्वचितच खाल्ला असेल. हा डोसा खाल्ला की पोटही भरतं आणि तोंडालाही चव येते. अगदी कमीत कमी आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थात होणारा हा डोसा कसा करायचा ते पाहूया (Jowar Dosa Easy Healthy Recipe).

साहित्य -

१. ज्वारीचे पीठ - पाऊण वाटी

२. दाणे - अर्धी वाटी 

३. मिरच्या - २ ते ३ 

४. आलं - अर्धा इंच

५. लसूण - ७ ते ८ पाकळ्या

(Image : Google)

६. तांदळाचे पीठ - पाव वाटी

७. मीठ - चवीपुरते

८. जीरे - अर्धा चमचा

९. हिंग - पाव चमचा 

१०. कोथिंबीर - अर्धी वाटी 

११. ओवा - पाव चमचा 

१२. तेल - अर्धी वाटी 

साहित्य -

१. दाणे, मिरच्या, आलं, लसूण, जीरे हे मिक्सरमध्ये घालून चांगले बारीक करुन घ्यायचे. 

२. एका बाऊलमध्ये हे मिश्रण घेऊन त्यात ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ घालून पाणी घालून हे सगळे एकजीव करावे. 

३. यामध्ये ओवा, मीठ, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे पीठ पुन्हा चांगले एकजीव करावे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालत राहावे. 

४. तवा गॅसवर ठेवून चांगला तापू द्यायचा. त्यावर तेल लावून मग हे पीठ एकसारखे तव्यावर पसरायचे. 

५. मध्यम आचेवर दोन्ही बाजुने हा डोसा चांगला भाजून घ्यायचा. 

६. चटणी किंवा लोणचे, सॉस अशा कशासोबतही हा डोसा अतिशय छान लागतो.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.