Join us  

स्वयंपाक करताना टाळा ऐनवेळेची फजिती आणि धांदल! झटपट स्वयंपाकासाठी किचनमधे तयार ठेवा फक्त 10 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 6:43 PM

स्वयंपाकघरात रोजच्या स्वयंपाकासाठी काही जिन्नस असायलाच हवेत. ते असले की रोजचा स्वयंपाक तर आटोपतोच पण अचानक कोणी आलं तर काय करावं हा प्रश्नही सहज सुटतो. यासाठी स्वयंपाकघरात या दहा गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्या?

ठळक मुद्देरवा हा नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्या अनेक पदार्थांसाठी वापरला जातो. रवा हा पौष्टिकसुध्दा असतो.झटपट भजी, वडे करण्यासाठी , धिरडे करण्यासाठी तसेच भाज्यांना घट्टपणा आणण्यासाठी, सारण भरुन भाज्या करण्यासाठी बेसन हे घरात हवंच.रोजची धावपळ टाळण्यासाठे आलं लसणाची पेस्ट करुन ती फ्रीजमधे ठेवावी. आठ्वड्याभराच्या भाजी आमटीसाठी लागणार्‍या प्राथमिक मसाल्याचा प्रश्नच सुटतो.

घाईच्या वेळेत स्वयंपाक करताना एखादी गोष्ट नसली की सगळं अडून बसतं. आपल्याला जेव्हा काही विशेष करायचं असतं तेव्हा आपण त्याप्रमाणे तयारी आधीच करुन ठेवतो. पण रोजच्या स्वयंपाकासाठी किंवा अचानक कोणी घरी आलं तर त्यांच्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात या दहा गोष्टी असणं गरजेचं आहे. आपल्या स्वयंपाकघरात या गोष्टी आहेत ना याकडे कायम लक्ष असायला हवं. नाहीतर ऐनवेळी धावपळ होते, स्वयंपाक बिघडतो, इतरांकडे जाऊन मागण्याची वेळ येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिडचिड होते. हे सर्व टाळण्यासाठी आणि साध्या स्वयंपाकाची गरज भागेल असे जिन्नस स्वयंपाकघरात कायम राहिल याबाबत प्रत्येक गृहिणीनं दक्ष असायला हवं.

स्वयंपाकघरात हे हवंच!

छायाचित्र- गुगल

1. तेल- तेलाशिवाय आपल्याकडे स्वयंपाक होतच नाही. घरात सोयाबीन तसेच मोहरीचं तेल असायलाच हवं. तसेच खोबर्‍याचं, शेंगदाण्याचं तेलही असावं. स्वयंपाकाची चव आपण वापरत असलेल्या तेलावरही अवलंबून असते. त्यामुळे आलटून पालटून तेल वापरल्यास नेहेमीच्याच स्वयंपाकाला वेगळी चव येते. खाणं कंटाळवाणं वाटत नाही.

2. रवा- रवा हा नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्या अनेक पदार्थांसाठी वापरला जातो. रवा हा पौष्टिकसुध्दा असतो. पोट बिघडल्यास रव्याची पेज खाल्ली तरी छान वाटतं. कोणी अचानक आल्यास पाहुणचारासाठी शिरा, खीर असे पदार्थ झटपट होतात. तसेच नाश्त्याला पटकन काहीतरी करायचं असेलत तर झटपट डोसे किंवा इडलीसाठी रवा हा स्वयंपाकघरात हवाच.

3. मसाले- स्वयंपाकघरात आपल्याला रोज लागणारे मसाले असायलाच हवेत. अख्खे धने,गरम मसाला, हळद, लाल तिखट, छोटी मोठी वेलची, तेजपान, दालचिनी, मिरे, कांद्याचं बी, केशर, मोहरी, जिरे, ओवा, कसूरी मेथी हे भाजी, आमटी, पुलाव यासाठीचे आवश्यक मसाले आहेत.

छायाचित्र- गुगल

4. बेसन- झटपट भजी, वडे करण्यासाठी , धिरडे करण्यासाठी तसेच भाज्यांना घट्टपणा आणण्यासाठी, सारण भरुन भाज्या करण्यासाठी बेसन हे घरात हवंच. एखाद दिवशी घरात कोणती भाजी नसली की बेसनाच्या पिठल्यावरही उत्तम जेवण होतं.

5. कोथिंबीर- स्वयंपाकाला विशेष चव येण्यासाठी कोथिंबीर गरजेची असते. तसेच पदार्थ गार्निश अर्थात सजवण्यासाठी कोथिंबीर हवीच. दर आठवड्याला आपल्याला रोज किती कोथिंबीर लागते या हिशोबाने छोटी मोठी जुडी आणून ती निवडून फ्रीजमधे नीट ठेवावी.

6. टमाटे किंवा टमाट्याची प्युरी- उसळी आणि भाज्यांना मसालेदार आणि दाटसर करण्यासाठी टमाटे घरात हवेच.आपल्या रोजच्या स्वयंपाकात अधून मधून टमाट्याची प्युरी लागत असेल तर एकदम काही टमाट्याची प्युरी करुन ती एका डब्यात ठेवून फ्रीजमधे ठेवावी. हवी तितकी वापरायला हाताशी राहाते.

7. पोहे- झटपट नाश्त्यासाठी पोहे घरात हवेच. तसेच फारशी भूक नसल्यास, स्वयंपाक करण्याचा कंटाळा आल्यास पोह्यांवरही भागवता येतं. तसेच पोह्यांचे कटलेट, वडे असे चटपटीत पदार्थही करता येतात. चटपटीत काही खायचं असल्यास बाहेर जाऊन धावाधाव करण्यापेक्षा घरात पोह्यांपासूनच वेगळं काही बनवता येतं.

छायाचित्र- गुगल

8. कांदे- बटाटे- घरातले कांदे बटाटे कधी संपूच देऊ नये. रोजच्या स्वयंपाकाला हे जितके आवश्यक तितकेच अडअडचणीला कामालाही येतात ते कांदे बटाटेच. बटाट्याचे तर असंख्य पदार्थ करता येतात. कांदा आणि बटाटा या दोन्हींचा उपयोग करुन साधे ते चटपटीत, मसालेदार असे पदार्थ सहज तयार करता येतात.

9. आलं-लसूण- भाज्यांना चव विशेष मसाल्यांनी नाही तर आलं लसणामुळे येते. तसेच चहासाठीही आलं हवंच असतं. रोजची धावपळटाळण्यासाठे आलं लसणाची पेस्ट करुन ती फ्रीजमधे ठेवावी. आठ्वड्याभराच्या भाजी आमटीसाठी लागणार्‍या प्राथमिक मसाल्याचा प्रश्नच सुटतो.

10. चहा कॉफी- आपल्या स्वत:साठी चहा कॉफी जितकी गरजेची तितकीच कोणी आलं तर खाण्याचे पदार्थ न करता केवळ झक्कास चहा किंवा मस्त कॉफी केली तरी भागतं. त्यामुळे कांदे बटाटे याप्रमाणे चहा कॉफी पावडरही संपू देऊ नये.