कॉफी हा विषय अनेकांना जीव की प्राण असतो. आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो कंटाळा आल्यावर तो दूर करण्यासाठी कॉफी हा एकच उत्तम पर्याय आपल्याला दिसतो. वाफाळती गरमागरम कॉफी समोर आली की आपल्याला मोह आवरत नाही, हे तितकच खरं. कॉफी पेक्षा तिच्या येणाऱ्या विशिष्ट सुगंधामुळेच आपण तिच्या प्रेमात पडतो. सगळ्यात आधी कॉफीचा अरोमा अनुभवायचा आणि मग फेसाळत्या कॉफीचे हळूच घोट घ्यायचे. हीच कॉफी पिण्याची खरी पद्धत आहे, असं म्हणायला हरकत नाही. जगभरात आपल्याला बरेच कॉफीप्रेमी दिसून येतात. तासंतास कॅफेमध्ये बसून मंद चालीची गाणी ऐकत फेसाळती गरम कॉफी पिणारी तरुण पिढी आपण पाहिलीच असेल. लॉकडाऊनमध्ये तर आपण कोल्ड कॉफी, डालगोना कॉफी, चॉकलेट कॉफी यांसारखे विविध प्रकार चक्क घरी करून पाहिले. मोठमोठ्या कॅफेमध्ये कॉफीचे प्रकार बनविण्यासाठी खास शेफ असतात तर कधी मशीनच्या मदतीने कॉफी तयार केली जाते. या कॅफेमध्ये मिळणाऱ्या कॉफीसारखी फेसाळती, गरमागरम कॉफी जर तुम्हाला घरी बनावता आली तर अजून काय हवं...
सुप्रसिद्ध मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी MasterChef Pankaj Bhadouria या आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून घरच्या घरी कॅफेस्टाईल कॅपेचिनो कस बनवता येईल, याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Cappuccino Recipe).
साहित्य -
१. कॉफी पावडर - २ टेबलस्पून
२. साखर - आवडीनुसार किंवा १ टेबलस्पून
३. बर्फाचे खडे - ३
कृती -
१. कॉफी पावडर आणि तुमच्या आवडीनुसार साखर एकत्रित करून मिक्सरमध्ये त्यांची बारीक पूड करून घ्यावी.
२. कॉफी पावडर आणि साखर यांची पूड झाल्यावर त्यात बर्फाचे खडे टाकावे व परत एकदा हे मिश्रण मिक्सर करून काढून घ्यावे.
३. हे मिश्रण एकदम जाडसर किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. मध्यम कंन्सिस्टंसीचे मिश्रण असावे.
कॅपेचिनो सर्व्ह करताना -
१. एक कॉफी मग घ्या.
२. या मगमध्ये, कॉफी पावडर, साखर, बर्फ यांचे केलेलं मिश्रण घाला.
३. या मिश्रणात आपल्या आवडीप्रमाणे गरम दूध ओता.
४. चमच्याने ही कॉफी ढवळून घ्या.
घरच्या घरी कॅफेसारखे कॅपेचिनो झटपट तयार.