Join us  

खमंग, कुरकुरीत, चटकदार चिवड्यासाठी फक्त या 10 गोष्टी करा; चिवडा असा की खातच राहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 12:58 PM

दिवाळीच्या फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चिवडा. प्रत्येकाची चिवडा बनवण्याची काही खासियत असते. पण यामध्ये काही गोष्टींची भर घातल्यास तो आणखी छान होण्याची शक्यताच अधिक

ठळक मुद्देकसा कराल चिवडा खमंग आणि कुरकुरीतसोप्या युक्त्या वापरा आणि दिवाळीचा फराळ करा चविष्ट

चिवड्याशिवाय दिवाळीतील फराळाचे ताट पूर्णच होऊ शकत नाही. दिवाळीशिवायही मुलांना मधल्या वेळेचा खाऊ म्हणून केला जाणारा हा चिवडा कुरुम कुरुम आणि छान चविष्ट व्हावा यासाठी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. दिवाळीत प्रत्येकाकडे आपल्या आवडीनुसार पातळ पोह्याचा चिवडा, भाजक्या पोह्यांचा चिवडा, मक्याचा चिवडा, नायलॉन पोह्यांचा चिवडा असे वेगवेगळ्या पोह्यांचे चिवडे केले जातात. हा प्रत्येक चिवडा करण्याची साधारण पद्धत सारखीच असली तरी तो कुरकुरीत राहणे महत्त्वाचे असते. चिवडा नरम पडला की त्यातली सगळी मजा जाते. मग कोणीही या चिवड्याकडे पाहातही नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा चिवडा खमंग होण्यासाठी काही टिप्स माहित असायला हव्यात. यातही तुमच्या घरात डायबिटीस किंवा हृदयरोगाचे रुग्ण असतील तर त्यांचे डाएट बघून तुम्ही थोडे बदल करुन हा चिवडा हेल्दी बनवू शकता. पाहूया चिवडा खमंग होण्यासाठी काही खास टिप्स...

१. कोणत्याही पोह्यांचा चिवडा करत असाल तरी पोहे बारीक गॅसवर भरपूर भाजून घ्या. पोहे पुरुसे भाजले न गेल्यास चिवडा लगेच चिवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुरकुरीत चिवड्यासाठी कंटाळा न करता पोहे जास्त वेळ हलके भाजून घ्या.

२. सध्या अनेकांना बीपीचा त्रास असतो. अशांना डॉक्टर जास्त मीठ खाऊ नका सांगतात. चिवड्यामध्ये मीठाचे प्रमाण बऱ्यापैकी असते. अशावेळी चिवडा तयार करताना मीठाच्या ऐवजी पादेलोण घातल्यास उत्तम. याने चिवड्याला चवही छान येते.

३. चिवड्यामध्ये विकतचा कोणता मसाला वापरणार नसाल तर जेवढं तिखट घालाल तितकीच पीठीसाखर घाला, त्यामुळे चिवडा छान लागेल.

४. चिवड्यामध्ये आपण मिरची, दाणे, खोबऱ्याचे काप, कडीपत्ता, डाळं हे सगळे घालतो. पण फोडणीमध्ये हे सगळे एकत्र तळू नका. तर प्रत्येक घटकाला वेगवेगळी हिट गरजेची असल्याने प्रत्येक घटक वेगळा तळून चिवड्यावर घाला. यामुळे तेल जास्त लागते असे तुम्हाला वाटेल पण तेल योग्य पद्धतीने निथळून त्याच तेलात पुढचा घटक तळून घेता येतो. हे पदार्थ एकत्र तळल्यास काही पदार्थ जळण्याची शक्यता असते. 

५. अनेकदा चिवडा केल्यावर खालच्या बाजूला मीठ, साखर आणि तिखट राहते आणि वरचा चिवडा बेचव लागतो. यासाठी अगदी कमी पाण्यात मीठ, साखर विरघळून घ्या आणि पोहे भाजून झाल्यावर त्यावर अगदी थेंबथेंबभर पाणी शिंपडा. 

६.  अनेकदा चिवडा ४ दिवसांतच नरम पडतो. पण असे होऊ नये म्हणून पोहे भाजताना त्यावर थोडेसे मीठ टाका. पोहे जास्त कुरकुरीत होण्यास मदत होते. यामुळे पोहे आकसल्यासारखे न दिसता आहेत तसे राहतात. 

७. फोडणीमध्ये हिंग, हळद, लाल तिखट घातल्यानंतर गॅस लगेचच बंद करावा नाहीतर हे जिन्नस लगेच जळतात आणि चिवड्याला कडवट चव येऊ शकते. 

८. थंडी असल्याने या चिवड्यामध्ये तीळ घातले तरीही चालतात. यामुळे चिवड्याला चांगला स्वाद येण्यासही मदत होते. तसेच आवडीनुसार आमचूर पावडर घातल्यास चिवडा थोडा आंबट-गोड लागतो.    

९. चिवडा झाल्यानंतर पुन्हा थोडा कढईमध्ये गरम केल्यास तो जास्त दिवस कुरकुरीत राहण्यास मदत होते. त्यानंतर तो गार झाल्यावर लगेच एयर टाइट केंटेनरमध्ये भरुन ठेवा. 

१०. चिवडा हलवताना अगदी हलक्या हाताने हलवा. याचे कारण पोहे भाजल्यावर जास्त हलके होतात आणि ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे चिवड्याचा भुगा होतो. पण भाजताना आणि सगळे जिन्नस हाताने एकत्र करताना हलक्या हाताने करा. त्यामुळे चिवड्याचे पोहे पूर्ण राहतील. 

 

टॅग्स :अन्नदिवाळी 2021कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.