थंडीचे दिवस म्हटले की आपल्याला सतत गरमागरम आणि चमचमीत काहीतरी खावसं वाटतं. सारखं सूप, आमटी, सार या गोष्टी पिऊन कंटाळा आलेला असतो. रात्रीच्या वेळी किंवा विकेंडला आपण नक्की काहीतरी वेगळं आणि सगळ्यांना आवडेल असं करायचा प्लॅन करत असतो. थंडी वाढत असल्याने या काळात आपण दही, गार पदार्थ अभावानेच खातो. सारखं वेगळं काय करणार असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर त्यासाठी आज आपण एक खास रेसिपी पाहणार आहोत. पंजाबमध्ये प्रसिद्ध असलेली ही रेसिपी थंडीच्या दिवसांत आवरर्जून ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मिटक्या मारत खातील असा हा पदार्थ नेमका कसा करायचा ते पाहूया (Kadhi Pakoda Recipe Winter Special)...
साहित्य -
१. दही - १ ते १.५ वाटी
२. साखर - १ चमचा
३. मीठ - चवीनुसार
४. फोडणीसाठी - जीरे, हिंग, हळद, आलं, मेथ्या
५. मिरच्या - २ ते ३
६. कडीपत्ता - ६ ते ७ पाने
७. डाळीचे पीठ - १ वाटी
८. ओवा - अर्धा चमचा
९. हिंग, हळद, तिखट, मीठ - वड्याच्या पीठासाठी
१०. कोथिंबिर - अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
११. तेल - अर्धी वाटी
कृती -
१. डाळीच्या पीठात मीठ, ओवा, तिखट, हिंग, हळद घालवून ते घट्टसर भिजवून घ्यायचे आणि या पीठाची भजी तळून घ्यायची.
२. कढीसाठी दह्याचे ताक करुन घ्या, त्यामध्ये साखर,मीठ घालून ते चांगले घुसळून घ्या. यामध्ये थोडे डाळीचे पीठ घाला. म्हणजे कढीला घट्टपणा यायला मदत होते.
३. कढीला फोडणी देण्यासाठी तेलात जीरे, कडीपत्ता, आलं, हिंग, हळद, मेथ्या, मिरचीचे तुकडे घाला.
४. फोडणी तडतडली की त्यामध्ये सगळे जिन्नस घातलेले ताक घाला आणि या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या.
५. कढी चांगली उकळली आणि गॅस बंद केला की मग त्यामध्ये तळलेले वडे घालून वरुन कोथिंबीर घाला.
६. कढी वड्यांमध्ये छान मुरते आणि मग हे मिश्रण मस्त लागते. ही गरमागरम कढी पोळी, भाकरी किंवा भात अशा कोणत्याही गोष्टीसोबत अतिशय चविष्ट लागते.