Join us  

वरण भातासोबत तोंडी लावायला करा कैरी-कांद्याची आंबट गोड चटणी, एकदा खाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2023 10:10 AM

Kairi Raw Mango Kanda Chutney Recipe : आजुबाजूच्या पदार्थांमुळे जेवणाची रंगत तर वाढतेच पण नकळत ४ घास जास्त खाल्ले जातात.

पोळी भाजी किंवा वरण भात काहीही ताटात असेल तरी त्याच्यासोबत तोंडी लावायला कोशिंबीर, चटणी, लोणचं, पापड असं काही ना काही आपल्यापैकी अनेकांना लागतं. भाजी कोरडी असेल तर आमटी किंवा पातळ काहीतरीही ताटात असावं असं वाटतं. महाराष्ट्रीयन पारंपरिक जेवणात अशाप्रकारे ताटात किमान ४ ते ५ पदार्थ असतातच. त्यामुळे आपल्याला लहानपणापासून तशीच सवय असते. आजुबाजूच्या पदार्थांमुळे जेवणाची रंगत तर वाढतेच पण नकळत ४ घास जास्त खाल्ले जातात (Kairi Raw Mango Kanda Chutney Recipe). 

आपल्याकडे प्रत्येक सिझनला त्या त्या सिझननुसार चटण्या, लोणची करायची पद्धत अगदी पूर्वीपासून आहे. थंडीच्या दिवसांत आवळा आणि लिंबाची लोणची किंवा चटण्या केल्या जातात. या काळात भाज्या जास्त असल्याने भाज्यांचे किंवा मिरच्यांचे लोणचेही आवर्जून घातले जाते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात कैरीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या आणि लोणची केली जातात. या चटण्यांचे असंख्य प्रकार असून कैरी आंबटगोड असल्याने त्यामुळे जेवणाची रंगत वाढण्यास निश्चितच मदत होते. कैरी आणि कांद्याची ही चटणी कशी करायची पाहूया...

साहित्य -

१. कैरी - २ लहान आकाराच्या 

२. कांदा - १

(Image : Google)

३. गूळ - १ वाटी 

४. तिखट - अर्धा चमचा 

५. मीठ - चवीनुसार 

६. तेल - २ चमचे 

७. जीरे - १ चमचा 

८. हिंग - पाव चमचा 

कृती -

१. कैरी आणि कांद्याच्या फोडी करुन घ्यायच्या.

२. या फोडी मिक्सरमध्ये फिरवून बारीक करुन घ्यायच्या.

३. त्यात गूळ, मीठ आणि तिखट घालून ठेवायचे. 

४. अर्धा तासानंतर हे सगळे चांगले मुरते आणि त्याला पाणी सुटते. 

५. छोट्या कढईमध्ये तेल घेऊन ते चांगले गरम करुन त्यात जीरं आणि हिंग घालून फोडणी करायची. 

६. गरम तडतडणारी फोडणी घातली की याला आणखी छान स्वाद येतो आणि ही चटणी खमंग लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.