विकेंड म्हटलं की आपल्याला तीच ती पोळी-भाजी, भात- आमटी नको असते. सारखी पोळी-भाजी खाऊन लहान मुलांना तर कंटाळा येतोच पण मोठ्यांनाही कंटाळा येतो. मग सारखं वेगळे काय करणार असा प्रश्न महिलांसमोर असतो. अशावेळी कधी पावभाजी केली जाते तर कधी इडली सांबार. कधी शेव भाजी, छोले असे झणझणीत, चविष्ट काही ना काही केले जाते. थंडीच्या दिवसांत असा गरमागर बेत मस्त वाटतो. एरवी आपण हॉटेलमध्ये किंवा एखाद्या ढाब्यावर काजूची उसळ खातो. पण घरी मात्र आपल्याला तशी चव जमेल की नाही शंका वाटते. पण काजूची उसळ बनवणे फार अवघड नसते. अगदी १५ मिनीटांत आपण ही चविष्ट उसळ बनवू शकतो. पाहूया याची सोपी रेसिपी (Kaju Curry Easy Recipe)...
साहित्य -
१. काजू - अर्धी वाटी
२. कांदे - २
३. टोमॅटो - १
४. दालचिनी - १ इंच
५. मसाला वेलची - १
६. तमालपत्र - २
७. आलं-लसूण पेस्ट - अर्धा चमचा
८. तिखट - अर्धा चमचा
९. गोडा मसाला - अर्धा चमचा
१०. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा
११. मीठ - चवीनुसार
१२. बटर - १ चमचा
१३. फ्रेश क्रिम - १ चमचा
१४. तेल - २ चमचे
१५. कोथिंबीर - अर्धी वाटी
कृती -
१. एका कांद्याचे उभे काप करुन घ्यायचे आणि उकळत्या पाण्यात कांदा आणि काजू थोडे वाफवून गार करुन मिक्सर करुन घ्यायचे.
२. एका पॅनमध्ये उरलेले काजू तेलावर थोडे गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचे.
३. त्याच पॅनमध्ये तेल घालून त्यात दालचिनी, वेलची आणि तमालपत्र घालायचे.
४. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट घालून सगळे चांगले परतून घ्यायचे.
५. यामध्ये टोमॅटो घालून त्यात तिखट, मसाला, धणे-जीरे पावडर घालून पुन्हा सगळे परतून घ्यायचे.
६. यात मिक्सर केलेली कांदा आणि काजूची पेस्ट घालायची आणि थोडे पाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करुन एक उकळी काढायची.
७. त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये परतलेले काजू आणि मीठ घालून १० मिनीटे वाफवून घ्यायचे.
८. वाफ आल्यानंतर वरुन बटर, फ्रेश क्रिम आणि कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा.
९. ही गरमागरम काजू करी पोळी, फुलके, कुलचा कशासोबतही छान लागतो.