Join us  

झणझणीत मसालेदार भाजी करण्यासाठी अस्सल पारंपरिक काळा मसाला, पाहा झ्टपट वाटण रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 12:01 PM

Kala masala vatan recipe : हे वाटण तयार करण्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे आणि ते कसे तयार करायचे पाहूया..

रोजच्या भाजीला किंवा आमटीला आपण दाण्याचा कूट, गोडा मसाला, ताजं खोबरं- कांद्याचं वाटण असं काही ना काही वापरतो. भाजी आणि आमटीला चव येण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ट्राय करतो. पण उसळ, एखादी ग्रेव्हीची भाजी किंवा भरलं वांगं, भरली भेंडी नाहीतर भरलं कारलं यांसारख्या भाज्यांना काळ्या मसाल्याचं वाटण असेल तरच त्या भाज्या चविष्ट होतात. नॉनव्हेजच्या पदार्थांसाठी तर अशाप्रकारचं काळ्या मसाल्याचं वाटण हमखास लागतंच लागतं. ऐनवेळी हे वाटण करण्यापेक्षा एखाद्या विकेंडला ते तयार करुन ठेवलं तर भाजी करण्याचं काम नक्कीच सोपं आणि झटपट होतं. आपण बाजारातून विविध प्रकारचे मसाले विकत आणतो. पण त्यापेक्षा घरच्या घरीच हे मसाले तयार केले तर आपल्याला हवी तशी चवही मिळते आणि कमीत कमी खर्चात भरपूर प्रमाणात वाटण तयार होते. हे वाटण तयार करण्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे आणि ते कसे तयार करायचे पाहूया (Kala masala vatan recipe)...

साहित्य - 

१. कांदे - पाव किलो

२. खोबरं - १०० ग्रॅम 

३. कोथिंबीर - 

४. लसूण - १५ ते १७ पाकळ्या 

५. आलं - २ इंच

(Image : Google)

६.खसखस - २ चमचे

७.धने - २ चमचे

८. जिरे - १ चमचा

९.तेल - ३ चमचे

१०. मीठ - १ चमचा

कृती -

१. कांदा पातळ उभा चिरुन घ्यायचा, खोबऱ्याचेही पातळ काप करुन घ्यायचे. 

२. कढईमध्ये तेल न घालता आधी खोबऱ्याचे काप लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. 

३. खोबरं काढून नंतर त्याच कढईत धणे, जीरे आणि खसखस भाजायची. 

४. याच कढईत नंतर कांदा सुरुवातीला थोडा कोरडा भाजून घ्यायचा आणि थोडा परतल्यानंतर मग २ चमचे तेल घालून परतायचा.

५. कांद्याला तांबूस रंग आला की त्यातच लसूण आणि आलं घालून तेही चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. 

६. मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये खोबरं, धणे, जीरे आणि खसखस हे कोरडे जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्यायचे. 

७. यामध्येच परतलेले कांदा-लसूण आणि आल्याचे मिश्रण घालून तेही मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे. 

८. वरुन कोथिंबीर आणि मीठ घालून पुन्हा मिक्सरमध्ये मिश्रण बारीक करुन घ्यायचे.

९. पाणी न घालता केलेला हा मसाला १० ते १२ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकतो आणि आवश्यकतेनुसार वापरता येतो.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.