अभिनेते आणि अभिनेत्री इतके सुंदर दिसतात आणि फिट असतात तर त्यांचे डाएट रुटीन किंवा फिटनेस रुटीन काय असते याबाबत आपल्याला कायमच उत्सुकता असते. अभिनेत्री इतक्या स्लीम फिट असतात, त्यांची त्वचा आणि केसही इतके सुंदर असतात तर त्यामागचे रहस्य काय असा प्रश्न आपल्याला बरेचदा पडतो. त्या नाश्ता आणि जेवणात काय खात असतील. डाएट फॉलो करताना त्या किती आणि काय गोड खात असतील असेही आपल्याला वाटते. पण त्याही आपल्यासारख्याच व्यक्ती असल्याने त्यांनाही आवडीनिवडी असणारच. आता हेच पाहा ना करिष्मा कपूर नाश्त्यामध्ये साधंसुधं काही खात नाही तर चक्क चीज केक खाते. आता तुम्ही म्हणाल सकाळच्या नाश्त्याला कोण चीज केक खातं. पण करिष्माला चीज केक इतका आवडतो की ती कसलाही विचार न करता बिनधास्त चीज केक खाते.
करिष्माने ९० चा काळ आपल्या अभिनयाने गाजवला असून आजही तिच्या सौंदर्यात तसूभरही फरक पडलेला नाही. आजही ती मोठ्या पडद्यावर फारशी अॅक्टीव्ह नसली तरी तिची फिगर आहे तशीच आहे. चीज केक हा सध्या अनेकांसाठी जीव की प्राण असतो. केकवरच आपले इतके प्रेम असते त्यात चीज म्हटल्यावर विचारायलाच नको. या केकच्या किंमतीही बाजारात अव्वाच्या सव्वा असतात. यामध्ये वेगवेगळ्या फळांचे, चॉकलेट किंवा आणखी बरेच फ्लेवर्सचे चीज केक मिळतात. पण आपल्याला घरच्या घरी चीज केक ट्राय करायचा असेल तर ही घ्या सोपी रेसिपी....
साहित्य
१. क्रिम चीज - ३ वाट्या२. जिलेटीन - ३ वाट्या३. व्हॅनिला इसेन्स - २ चमचे ४. ग्लुकोज बिस्कीट - २ वाट्या तुकडे ५. पाणी - ३ वाट्या ६. क्रिम - ६ वाट्या ७. साखर - १.५ वाटी८. लिंबाचा रस - २ चमचे ९. लोणी - ४ चमचे १०. ब्लूबेरी जॅम - अर्धी वाटी११. दूध - अर्धी वाटी
कृती
१. ग्लुकोज बिस्कीटची मिक्सरमध्ये पावडर करुन त्यात लोणी घालून एकसारखे फेटून घ्या आणि गार होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
२. एका बाऊलमध्ये क्रिम चीज, व्हॅनिला इसेन्स आणि लेमन ज्यूस एकत्र करुन घ्या. त्यात २ चमचे गरम दूध घाला
३. आता राहिलेले दूध एका पॅनमध्ये घेऊन त्यात हे क्रिम चीजचे मिश्रण घाला.
४. सतत हलवत राहा, एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात जिलेटीन घाला. थंड होऊ द्या.
५. गार झाल्यानंतर यामध्ये चीज घाला आणि एकसारखे हलवत राहा.
६. फ्रिजमध्ये बिस्कीटांचे मिश्रण गार करायला ठेवले असेल त्यावर तयार केलेले क्रिम एकसारखे लावा.
७. एका बाऊलमध्ये थोडे जिलेटीन थोड्या गार पाण्यात एकत्र करा. मग त्यामध्ये ब्लूबेरी जॅम एकत्र करा. हे उकळून गार होण्यासाठी ठेवा. हे मिश्रण चीज केकवर लावून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवा.
८. नंतर छोटे तुकडे करुन हा केक सगळ्यांना खायला द्या.