Join us  

१० मिनीटांत करा कारल्याचे टेस्टी चिप्स, भाजीला उत्तम पर्याय, सगळे खातील आवडीने, पाहा सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 3:31 PM

Karla Bitter gourd Crispy Chips Recipe by Chef Kunal Kapoor : पाहूयात कारल्याच्या चिप्सची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी...

कारल्याची भाजी म्हटली की घरातील सगळेच नाक मुरडतात. कारलं चवीला कडू असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच ते नको असते. मात्र आरोग्यासाठी हे कडू कारलं खाणं अतिशय फायदेशीर असतं. आता या कारल्याचा कडूपणा घालवायचा कसा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकींना स्वयंपाक करताना पडतो. मग कधी ते खूप काळ पाण्यात भिजवून, फडक्यात बांधून किंवा चिंच-गूळ घालून भाजी केली तरी ती थोडी का होईना कडू होतेच. मग औषधाप्रमाणे ही भाजी खावी लागते. पण जबरदस्ती अशी भाजी खाण्यापेक्षा या कारल्याचे कुरकुरीत चिप्स केले तर? 

हे चिप्स खायलाही छान लागतात आणि कारलंही खाल्लं जातं. चिप्स हा लहानग्यांचा आणि मोठ्यांचाही आवडता प्रकार असल्याने ते आवडीने खाल्ले जातात. आता हे चिप्स करायचे कसे? तर प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर झटपट आणि खमंग चिप्स कसे करायचे याची रेसिपी सांगतात. कुणाल कपूर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कायमच काही ना काही शेअर करत असतात, त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही बरीच आहे. आता इन्स्टाग्रामवर त्यांना कारल्याचे कुरकुरीत चिप्स कसे करायचे ते सांगितले आहे (Karla Bitter gourd Crispy Chips Recipe by Chef Kunal Kapoor)...

साहित्य - 

१. कारली - २ 

२. मीठ - पाव चमचा 

(Image : Google)

३. लिंबाचा रस - २ चमचे

४. काळं मीठ - पाव चमचा 

५. हळद - अर्धा चमचा

६. तिखट - अर्धा चमचा 

७. कॉर्न स्टार्च - १ चमचा

८. बेसन पीठ - २ चमचे 

९. आमचूर पावडर - अर्धा चमचा

कृती - 

१. कारली स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून पातळ काप करुन घ्यायचे. 

२. त्यावर मीठ आणि लिंबाचा रस घालून ते ३० मिनीटांसाठी तसेच ठेवायचे. 

३. त्यानंतर ही कारली एका बाऊलमध्ये पाण्यात चांगली भिजवायची. 

४. मग काढून एका फडक्यावर टाकून कोरडी करुन घ्यायची. 

५. एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यावर काळं मीठ, आमचूर पावडर, हळद, तिखट, कॉर्न स्टार्च, बेसन पीट घालून सगळे चांगले घोळवून घ्यायचे. 

६. तव्यावर तेल घालून घोळवलेले चिप्स तेलात फ्राय करुन घ्यायचे. मग हे कुरकुरीत चिप्स खाण्यासाठी तयार. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.