मेथीची भाजी कोणाला आवडत नाही. ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत इतकी आवडते की लग्नात पुरुष मेथीचा समावेश असलेला उखाणाही घेतात. पण मेथी कितीही आवडत असली तरी एरवी तिचा जेवढा वापर स्वयंपाकात होतो तितका सढळ वापर पावसाळ्यात होत नाही. याला कारण मेथीचे या काळात वाढलेले दर परवडत नाही. पण यावरही उपाय आहे. ताजी मेथी परवडत नसेल तर त्याऐवजी कसुरी मेथी (kasuri methi) वापरता येते. सुकी भाजी, रश्याची भाजी, वरण, आमटी, धिरडे, पराठे इतकंच नाही तर पोळीच्या पिठातही कसुरी मेथी (kasuri methi for taste) वापरुन त्याचा स्वाद वाढवता येतो. पण कसुरी मेथी ही फक्त स्वादासाठीच वापरली जाते असं नाही तर स्वयंपाकात कसुरी मेथी वापरणं हे आरोग्यासाठीही (health benefits of kasuri methi) फायदेशीर असतं.
Image: Google
रिसर्च गेटने केलेल्या एका अभ्यासानुसार मेथीची ताजी पानं सुकवून ती व्यवस्थित साठवून ठेवल्यास ती दीर्घ काळापर्यंत वापरता येतात. कसुरी मेथीमध्ये आरोग्यास लाभदायक जीवनसत्व, खनिजं आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं . कसुरी मेथी करताना मेथी उन्हात वाळवल्यामुळे ताज्या मेथीत असलेलं क जीवनसत्वं कसूरी मेथीत थोडं कमी होतं. मात्र कसुरी मेथीत कॅल्शियम आणि लोहाचं प्रमाण भरपूर असतं. तर कर्बोदकाचं प्रमाण अतिशय कमी असतं. कसुरी मेथीत असलेले हे सर्व पोषक घटक आरोग्यास लाभदायक असतात.
Image: Google
कसुरी मेथी स्वयंपाकात वापरल्यास..
1 कसुरी मेथीमध्ये उष्मांक कमी असतात. कसुरी मेथी ही औषधी वनस्पतीचा प्रकार असून कसुरी मेथीसारख्या ड्राय हर्ब्समुळे रक्तातील बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं आणि गुड कोलेस्टेराॅलची पातळी वाढते.
2. त्वचेसाठी कसुरी मेथी ही अतिशय फायदेशीर मानली जाते. कसुरी मेथी ही पाण्यासोबत वाटून त्याची पेस्ट करुन लेपासारखा त्याचा उपयोग केला जातो. कसुरी मेथीमध्ये असलेले ॲण्टिऑक्सिडण्ट्स त्वचेतील विषारी घटक कमी करतात. कसुरी मेथीच्या वापरानं चेहेऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, उन्हाने जळालेली त्वचा बरी होते. कसुरी मेथीचा लेप चेहेऱ्यास लावल्यास चेहेऱ्यावरील मृत पेशी निघून जातात. त्वचेचं आरोग्य राखण्यास कसुरी मेथीचा उपयोग होतो.
3. कढी, आमटी, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी यात प्रामुख्यानं कसुरी मेथीचा उपयोग केला जातो. कसुरी मेथी पोटात गेल्यानं फायबर मिळतं. त्यामुळे पचन क्रिया संतुलित राहाते. अपचन, बध्दकोष्ठता या पोटाशी निगडित समस्या दूर होतात. बध्दकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी पाण्यासोबत कसुरी मेथी सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मधुमेहाच्या समस्येत फायदेशीर असलेली कसुरी मेथी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते.
Image: Google
घरच्याघरी कसुरी मेथी
बाहेर विकत कसुरी मेथी मिळत असली तरी घरी तयार केलेल्या कसुरी मेथीचा स्वाद हा जास्त चांगला लागतो. घरच्याघरी कसुरी मेथी तयार करणं अतिशय सोपं आहे. छान मोठी पानं असलेली मेथीची जूडी आणावी. मेथी निवडून केवळ पानं घ्यावी. ही पानं स्वच्छ धुवून कापडावर किंवा ताटात पसरवून ठेवून उन्हात 2/3 दिवस वाळवावी. मेथी कुरकुरीत होईपर्यंत वाळवावी. वाळलेली मेथी हातानं थोडी चुरुन हवाबंद डब्यात भरुन ठेवावी, ही कसुरी मेथी वरण, भाजी, कढी, भजी , वडे यात स्वाद वाढवण्यासाठी वापरता येते. तिखट मिठाच्या पुऱ्यांमध्ये, धिरडी, धपाटे, दशम्या यातही कसुरी मेथीचा उपयोग स्वादिष्ट लागतो.