दुपारी आपण व्यवस्थित जेवलो तरी संध्याकाळी चहाच्या वेळी तोंडात टाकायला आपल्याला काही ना काहीतरी लागतंच. अशावेळी तळलेले किंवा पॅकेट फूड न खाता हेल्दी आणि तरीही चटपटीत काही खायला मिळाले तर? खाकरा हा हेल्दी पदार्थांपैकी एक असल्याने अनेकदा आपण मधल्या वेळात खाण्यासाठी खाकऱ्याला प्राधान्य देतो. याच खाकऱ्यापासून थोडे हटके असे सँडविच केले तर? सँडविच म्हटलं की आपल्याला ब्रेड आठवतो. पण ब्रेड मैद्याचा असल्याने तो आरोग्यासाठी अजिबात चांगला नसतो. अशावेळी खाकऱ्यापासून झटपट आणि चविष्ट असे सँडविच नक्की ट्राय करुन पाहा (Khakra Sandwich Recipe).
आपण सँडविचला ज्याप्रमाणे वेगवेगळ्या चटण्या आणि सॅलेड लावून सजवतो त्याचप्रमाणे ब्रेडऐवजू खाकऱ्याला वेगवेगळ्या चटण्या लावायच्या. यामध्ये हिरवी चटणी, शेजवान चटणी, सॉस असे आपल्याला आवडेल असे काहीही लावू शकतो. खाकरा भाजून कुरकुरीत झालेला असल्याने हे सँडविच खाताना अतिशय छान लागते. चटण्या लावल्यानंतर आपण सँडविचमध्ये ज्याप्रमाणे कांदा, टोमॅटो, काकडी, बटाटा, कोबी, ग्रीन सलाड असे काही ना काही घालतो. त्याचप्रमाणे या खाकऱ्यावरही आपल्याला आवडणाऱ्या भाज्या घालायच्या. खाकऱ्यामध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी असल्याने डाएट करणाऱ्यांनाही ही रेसिपी अगदी नक्की चालू शकेल.
त्यावर ओरीगॅनो, चिली फ्लेक्स, मीरपूड, काळं मीठ असे आपल्या आवडीचे मसाले घालून या खाकरा सँडविचचा स्वाद वाढावा यासाठी प्रयत्न करावेत. त्यावर भरपूर चीज किसून टाकल्यावर वरच्या बाजुने आणखी एक खाकरा लावावा. मग याचे एकसारखे ४ भाज करुन सँडविच खातो त्याच पद्धतीने हे खाकरा सँडविच खायला हवे. खाकऱ्यावर चटण्या आणि सलाड लावल्याने ते मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सँडविच केल्या केल्या खाल्ले तर चांगले कुरकुरीत लागते. आता तर बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरचे खाकरे मिळत असल्याने हेल्दी आणि चटपटीत अशी ही रेसिपी आपण अगदी सहज करु शकतो. झटपट होणारी आणि पोटभरीची असलेली ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. तेव्हा एकदा नक्की ट्राय करा खाकरा क्लब सँडविच.