रात्रीच्या वेळी कुठून बाहेर जाऊन आलो किंवा जेवण बनवायचा कंटाळा आला की आपल्या सगळ्यांच्या घरात मूगाच्या डाळीची खिचडी आवर्जून केली जाते. मग कधी त्यासोबत कढी तर कधी पापड आणि लोणचे असतेच. थंडीच्या दिवसांत गरमागरम खिचडी आणि त्यावर सोडलेली तूपाची धार म्हणजे थकलेले असल्याव सुखच. आपल्याला वाटते की आपणच खिचडी खातो की काय, पण अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनाही खिचडी मनापासून आवडत असल्याने त्या आवर्जून सांगतात. नुकतेच रकुलप्रीत सिंहने आपल्याला खिचडी आवडत असल्याचे सोशल मीडिया माध्यमातून स्पष्ट केले. वजन कमी करण्याच्या नादात कार्बोहायड्रेटस कमी घ्यायचे म्हणून अनेक जण भात खाण्याचे टाळतात. मात्र त्याचवेळी आपली एनर्जी लेव्हल टटिकवून ठेवण्यासाठी आपण आहारात खिचडी आवर्जून घेत असल्याचे रकुलप्रीत सांगते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ मुनमुन घनेरीवाल हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस् रिपोस्ट करत रकुलप्रीतने आपले खिचडी प्रेम व्यक्त केले आहे. ‘खिचडी हा कार्बस नाही, तर मूड आहे’ असे रकुलप्रीतच्या आहारतज्ज्ञाने म्हटल्यावर ती यावर खिचडी मूड अशी कॅप्शन देते. तर मुनमुन हिने आपल्या पोस्टमध्ये रकुलप्रीतला टॅग केल्याचेही पाहायला मिळते. त्यामुळे तिला खिचडी आवडत असल्याचे यावरुन दिसून येते.
खिचडी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे का?
1. केवळ पोट भरण्यासाठी नाही तर खाल्ल्यावर तृप्त वाटण्यासाठीही आपण अन्नाचे सेवन करतो. एक बोलभर खिचडी खाल्ल्यावर आपल्याला तृप्त झाल्याचे फिलिंग येते, कारण त्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेटस ज्यामुळे मेंदूलाही उत्तेजित झाल्यासारखे वाटते.
2.कार्बोहायड्रेटसमुळे सिरोटोनिन या आनंदी ठेवणाऱ्या हार्मोनची निर्मिती होते. हा हार्मोन तयार झाल्यावर आपला मूड नकळतच चांगला होतो आणि आपल्याला आनंदी वाटते. म्हणून खिचडी खाल्ल्यावर आपला मूड सुधारतो.
3.गेल्या काही काळापासून डाएटचे फॅड आले आहे तसे आपण आहारातील कार्बोहायड्रेटससारख्या काही घटकांना लठ्ठपणा वाढवणारे पदार्थ असे लेबल देऊन टाकले. पण प्रत्यक्षात तसे नसते, सगळेच कार्बोहायड्रेटस सारखे नसतात. काही कार्बोहायड्रेटसमुळे तुमच्या मेंदूला चालना मिळायला मदत होते आणि शरीरालाही ऊर्जा मिळण्यास मदत होते.
4. खिचडीमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक घटक असतात, त्यामुळे आपण लहान बाळांना घन आहार सुरू केला की सगळ्यात आधी खिचडी देतो. तर वय झालेल्या व्यक्तींना आणि आजारी व्यक्तींनाही हलका आहार म्हणून खिचडी देण्यास सांगितले जाते.
5.तांदूळ आणि मसूर डाळ योग्य प्रमाणात घेऊन त्याची खिचडी केल्यास आणि त्यावर तूप घेतल्यास हा एक उत्तम पोषक आहार होतो. कारण या माध्यमातून आपल्याला प्रथिने, फॅटस, कार्बोहायड्रेटस, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर असे सगळे घटक मिळतात. यामुळे केवळ पोषण मिळत नाही तर मेटाबॉलिझम सुधारण्यासही मदत होते. खिचडी पचण्यास हलकी असते, तसेच ती करायलाही सोपी असल्याने आहारात खिचडीचा आवर्जून समावेश असायला हवा.
6.वरण-भात आणि खिचडी अनेकदा सारख्याच घटकांपासून तयार केलेली असली तरी खिचडी भातापेक्षा जास्त चांगली असते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ती थोडी पातळ स्वरुपात असल्याने पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते. तसेच त्यामध्ये वेगवेगळे मसाले घातलेले असल्याने त्याला एक छान चव आल्याने आपण ती चवीने खातो त्यामुळे पोट भरल्याची भावना तयार होते.