Join us  

खाणार का उकळत्या लाव्हारसावर भाजलेला ‘ज्वालामुखीवरचा पिझ्झा’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 2:28 PM

पिझ्झा खायला लहानमोठे कुठंही जाऊ शकतात हे खरं पण थेट ज्वालामुखीच्या डोंगरावर? होय, सध्या हाच पिझा चर्चेत आहे.

ठळक मुद्देज्वालामुखीवर भाजलेला पिझ्झा ही कल्पनाच भन्नाट.

जगातील अनेक भागात जिवंत आणि सुप्त ज्वालामुखी आहेत. हे ज्वालामुखी केव्हा फुटतील आणि त्यापासून लोकांना धोका होईल हे कधीच सांगता येत नाही. पण त्या त्या देशातील सरकारने यासंदर्भात स्थानिक लोकांना आधीच इशारावजा सूचना देऊन ठेवलेल्या असतात. ग्वाटेमाला हा असा देश आहे, जो केवळ ज्वालामुखीमुळेच ओळखला जातो. या देशात अनेक ज्वालामुखी आहेत. त्यातले काही निद्रिस्त आहेत, तर काही जिवंत. मधूनच काही ज्वालामुखी फुटण्याच्या घटनाही इथे घडत असतात. या ज्वालामुखीतून बऱ्याचदा लाव्हारसाची नदीच वाहते.नागरिकही आता त्याला सरावले आहेत आणि हा ज्वालामुखी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरला आहे. त्यातही डेव्हीड गार्सिया या हुशार व्यक्तीनं मात्र त्यातच सुवर्णसंधी शोधली आणि या लाव्हारसाच्या उकळत्या नदीवरच त्यानं आपलं ‘किचन’ उभारलं. या उकळत्या लाव्हारसावर पिझ्झा तयार करुन विकायला त्यानं सुरुवात केली.

या लाव्हारसाचं तापमान एक हजार अंशापेक्षाही जास्त असतं. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एक ज्वालामुखी फुटला आणि अजूनही त्यात लाव्हारस उकळतोच आहे. या ज्वालामुखीचं नाव आहे पॅकाया आणि हा सक्रिय ज्वालामुखी आहे. गेली ७० वर्षे तो निद्रिस्त होता, पण गेल्या फेब्रुवारीमध्ये तो पुन्हा सक्रिय झाला. हा ज्वालामुखी पर्यटकांसाठीआकर्षण, म्हणून मग डेव्हीड गार्सिया या हुशार व्यक्तीनं या लाव्हारसाच्या उकळत्या नदीवरच त्यानं आपलं ‘किचन’ उभारलं. या उकळत्या लाव्हारसावर पिझ्झा तयार करुन विकायला त्यानं सुरुवात केली. सुरुवातीला त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण सोशल मीडियावर या सदंर्भातले फोटो, व्हिडीओ प्रसिद्ध झाले आणि जगभरात ‘ज्वालामुखीवर भाजल्या जाणाऱ्या’ या पिझ्झाचा बोलबाला झाला. या पिझ्झासाठी स्थानिक लोकांनी तर डेव्हीडकडे गर्दी केलीच, पण परदेशातून येणारे अनेक पर्यटकही या पिझ्झाचा स्वाद घेण्यासाठी खास डोंगर चढून वर यायला लागले. ‘ज्वालामुखीवरचा पिझ्झा’ या कल्पनेचंच लोकांना इतकं कौतुक वाटलं, की त्यांनी तिथे गर्दी करायला सुरुवात केली आणि त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली, त्यामुळे डेव्हीड आणखीच फेमस झाला.

अर्थातच डेव्हीडचं ज्वालामुखीवरचं हे किचन अस्थायी स्वरुपाचं आहे. म्हणजे या लाव्हारसाच्या परिसरात आसपास कुठेही तो आपले पिझ्झा तयार करतो. त्यासाठी त्यानं एक विशिष्ट प्रकारची प्लेट ही तयार केली आहे, जी एक हजार अंश सेल्सिअस तापमानाचा ही सहजतेने सामना करू शकेल. या लाव्हारसाजवळ जाण्यासाठी खास सुरक्षात्मक कपडेही त्याने तयार करुन घेतले आहेत. हातात ग्लोव्हज, पायात विशिष्ट बूट आणि डोक्यापासून पायापर्यंत ‘सुरक्षा ड्रेस’ परिधान करून तो हे पिझ्झा तयार करतो.

डेव्हीड सांगतो, ‘ज्वालामुखीवर भाजलेला पिझ्झा मी खाल्ला आहे’ हा अनुभवच लोकांना अतिशय रोमांचक आणि ‘थ्रिलिंग’ वाटतो. जवळपास एक हजार अंश सेल्सिअस तापमानावर भाजलेल्या पिझ्झाची चव ही अतिशय अनोखी लागते आणि लोकांना ती आवडते ही. त्यामुळेच माझा पिझ्झा जगभरात इतका लोकप्रिय झाला. ग्वाटेमाला या राजधानीच्या ठिकाणाहून हे स्थळ केवळ २५ किलोमीटर आहे. तिथे आणखीही दोन सक्रिय ज्वालामुखी आहेत. पण सध्या हा ज्वालामुखी लोकांच्या आकर्षणाचं केंद्र झाला आहे. त्यात डेव्हीडचं ‘पिझ्झा किचन’ लोकांसाठी जणू चुंबक झालं आहे. केवळ हा पिझ्झा खाण्यासाठी देश विदेशातील पर्यटक ज्वालामुखीचा हा डोंगर चढून येतात. या अनुभवाबद्दल अनेक पर्यटक म्हणतात, ‘इतकी मेहनत करुन डोंगर चढल्यानंतर समोर निसर्गाचा एक विलक्षण, अद‌्भुत असा चमत्कार आणि नजरेसोबत जिभेचं पारणं फेडणारा ज्वालामुखीवरचा गरमागरम पिझ्झा हा संयोग म्हणजे मजा’!

डेव्हीड गार्सिया हा खरं तर मुळचा एक अकाऊण्टंट, पण निसर्गरम्य ठिकाणी आपण लोकांना चविष्ट पिझ्झा पुरवला तर तो लोकप्रिय होऊ शकेल, अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि सर्वात आधी, २०१३ मध्ये पहाडाच्या एका छोट्या गुहेमध्ये त्यानं पिझ्झा बनवायला सुरुवात केली. त्याची ही कल्पना अनोखी असली तरी सुरुवातीला तिला अत्यल्प प्रतिसाद होता. ज्वालामुखी फुटून त्यातून लाव्हारस वाहायला लागल्यावर ‘हेच आपलं किचन’ हे त्याच्या मनानं घेतलं आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय ही झालं.

 

कल्पनाच इतकी भन्नाट..

हा ज्वालामुखी जोपर्यंत सक्रिय आहे, तोपर्यंत डेव्हीडचा पिझ्झाही खवय्यांच्या पोटाची भूक भागवत राहील आणि त्यांना या डोंगराकडे खेचून आणेल. यासंदर्भात केल्ट वॅन मूर्स या पर्यटकाचं म्हणणं आहे. लाव्हारसावर भाजलेला पिझ्झा खाणं ही कल्पना कोणालाही हास्यास्पद वाटू शकेल, पण त्यातलं थ्रिल, मजा आणि गंमत केवळ इथेच कळू शकेल ! तर फिलीप एल्डाना हा पर्यटक म्हणतो, ज्वालामुखीवर भाजलेला पिझ्झा ही कल्पनाच इतकी भन्नाट होती, की तिनं मला इथे अक्षरशः खेचून आणलं. त्यानंतरची तृप्ती तर वर्णनातीत आहे.

टॅग्स :अन्न