मसाल्याविना भाज्यांची कल्पना तरी करु शकतो का आपण? आपल्या भारतीय स्वयंपाकाची खासियतच मुळी विविध मसाल्यांमुळे येणार्या स्वादात आहे. अमूक भाजीला कोणता मसाला घालायचा हे आपल्याला माहित असतं. पण फोडणीत मसाले कधी घालायचे, कोणते मसाले वरुन घालायचे हे आपल्याला खचितच माहिती असेल. कितीही मसाले घातले तरी भाजी किंवा ग्रेव्हीची चव उठत नाही. अशा परिस्थितीत आपण त्या विशिष्ट कंपनीच्या मसाल्यांना दोष देतो. पण दोष मसाल्यांचा नसून त्यांना भाजीत टाकताना आपण केलेल्या चुकांचा असतो. हिंग, हळद, तिखट, काळा मसाला, धने पावडर, गोडा मसाला, सब्जी मसाला अशा मसाल्यांचा वापर आपण करतो. हे मसाले भाजीत स्टेप बाय स्टेप घातले गेले तरच ‘ मस्त झाली भाजी’ असं आपल्याला मनापासून वाटू शकतं.
छायाचित्र- गुगल
मसाले टाकण्याची योग्य पध्दत
1. कोणतीही भाजी करताना सर्वात पहिले कढईत तेल गरम करावं. जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल तेव्हाच त्यात जीरे, मोहरी, तेज पान किंवा कढीपत्ता घालावा. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालावी. अनेकदा भाजी फोडणीला घालतना एवढी घाई केली जाते की तेल नीट गरमही होवू दिलं जात नाही की त्यात जिरे, मोहरी टाकली जाते. हे दोन्ही नीट तडतडले की त्याचा स्वाद फोडणीत उतरतो. पण जर ते तेल गरम न झाल्याने तडतडलेच नाही तर हा स्वाद तेलात उतरत नाही. त्यामुळे भाजी फोडणी घालताना तेल कमी तापलेलं असूनही चालत नाही आणि जास्त तापलेलं असूनही चालत नाही.
2. रश्याची भाजी करताना त्यात कांद्याचा मसाला घातला जातो किंवा कांदा अगदी बारीक चिरुन घातला जातो. रश्याची भाजी तेव्हाच दाटसर होते जेव्हा भाजीतला कांदा व्यवस्थित शिजतो. त्यामुळे बारीक चिरलेला कांदा नीट शिजण्यासाठी फोडणीत कांदा घातल्याबरोबर त्यात एक चिमूट मीठ आणि हळद घालावी. यामुळे कांदा चांगला परतला जातो आणि लवकर शिजतो. मीठ आणि हळद घातल्यानंतर कढईवर थोडा वेळ झाकण ठेवावं. रश्याची भाजी करताना फोडणीत कांदा आणि टमाटा कधीही एकत्र घालू नये.
3. अनेकजणी फोडणीत कांदा घातल्याबरोबर टमाटा घालतात आणि त्या भाजीसाठी लागणारे सर्व मसाले एकत्र करुन भाजीत एकदम घालतात. पण या कृतीमुळे भाजीची चव बिघडते. त्यामुळे फोडणीत घातलेला कांदा, टमाटा आणि भाजी थोडी शिजत नाही तोपर्यंत इतर मसाले घालू नये. भाजीत मसाले घातल्यानंतर भाजी थोडा वेळ झाकण ठेवून शिजू द्यावी. मसाले घातल्यानंतर कढई उघडीच ठेवली तर मसाल्यांचा स्वाद भाजीत न शिरता उडून जातो.
छायाचित्र- गुगल
4. भाजीत गरम मसाला घालण्याचा नियम आहे. कधीही गरम मसाला अन्य मसाल्यांसोबत घालू नये. गरम मसाला हा गॅ स बंद करण्याच्या पाच ते दहा मिनिटं आधी घालावा. जर गरम मसाले अख्खे घालणार असल्यास ते इतर मसाल्यांसोबत घातले तरी चालतात.
5 भाजीत जर काळी मिरी घालायची असतील तर ती पूड करुनच घालावी. लवंग घालायची असल्यास ती आख्खी घालावी.
6. रश्याच्या भाज्या करताना फोडणीला घातलेला कांद्याच्या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला परतत राहावा. तेल सुटलं की मग भाजी आणि इतर मसाले घालावेत.
7. भाजी कोरडी असू देत नाही तर रश्याची कोथिंबीर किंवा कसूरी मेथी घालायची असल्यास ती गॅस बंद केल्यावरच घालावी. कसुरी मेथी घालताना ती हातावर थोडी चुरुन घ्यावी.