स्वयंपाक करणं ही एक कला आहे, कौशल्य आहे. विविध घटक एकत्र करुन विशिष्ट चवीचे पदार्थ तयार करणं ही सोपी गोष्ट नाही. मग ते फोडणीचं वरण असो की पनीरची ग्रेव्ही. पदार्थ गोड, आंबट, तिखट या कोणत्यही चवीचा असला तरी तो करताना सर्व घटकांचा समतोल राखून पदार्थ चवदार करणे म्हणजे एक कौशल्यच. अर्थात हा समतोल साधणं नंतर सरावानं अंगवळणी पडत असलं तरी हा समतोल कधी ना कधी बिघडतो. मग प्रश्न पडतो की चवबिघडलेल्या पदार्थाचं करायचं काय?
छायाचित्र- गुगल
स्वयंपाक करताना चवीचा विचार करता मीठाचं प्रमाण खूपच जपावं लागतं. पदार्थ कोणताही असो मीठ हे लागतं चवीपुरतंच. पण कधी कधी नेहेमीच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात भाजी किंवा आमटी करताना मीठाचं प्रमाण चुकतं आणि भाजी -आमटीची चव बिघडते. मीठ जास्त झालं म्हणून भाजी आमटी टाकवतही नाही आणि मीठाच्या अति प्रमाणामुळे भाजी आमटी खाल्लीही जात नाही. अशा वेळेस मीठ जास्त झालेलं असतानाही ते जास्त झालं आहे असं लागू नये यासाठीच्या युक्त्या वापरुन पाहाव्यात. या युक्त्या वापरुन पहाणं अतिशय सोप्या आणि परिणामकारक आहेत.
छायाचित्र- गुगल
भाजी-आमटीत मीठ जास्त झालं तर?
1. भाजी आमटीत जर मीठ जास्त पडलं तर त्यात पाणी घालून त्याची चव बिघडवण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्यांचा वापर करावा. कणकेच्या मणींएवढ्या छोट्या छोट्या गोळ्या कराव्यात आणि त्या भाजीत किंवा आमटीत टाकाव्यात. या गोळ्यांमुळे भाजी आमटीत जास्त झालेल्या मीठाची चव निघून जाईल. हा उपाय आमटी आणि रश्याच्या भाजीत मीठ जास्त झालं तर करावा.
2. उकडलेला बटाटा हा देखील भाजी आमटीत मीठ जास्त झाल्यावर चव सुधारण्यासाठी वापरता येतो. जेव्हा पाहुणे येणार असतील आणि एरवीपेक्षा भाजी आणि आमटी जास्त करावी लागणार असेल तर एक दोन बटाटे उकडून ठेवावेत. भाजी आमटीत मीठ जास्त झालं आहे असं वाटल्यास उकडलेला बटाटा कुस्करुन भाजी /आमटीत घालून चांगली उकळी काढावी. यामुळे भाजी किंवा आमटी दाटसरही होते आणि जास्त झालेल्या मीठाची चवही जाते.
छायाचित्र- गुगल
3. कधी कधी नेहेमीच्याच प्रमाणात स्वयंपाक करतानाही लक्ष नाही म्हणून किंवा घाई घाईत जास्त मीठ घातलं जातं. अशा वेळेस बेसनाचा उपयोगही करता येतो. यासाठी एक दोन चमचे बेसन कोरडं भाजून घ्यावं आणि ते भाजी/ आमटीत घालावं. आमटी किंवा रश्याच्या भाजीत भाजलेलं बेसन घालतान त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्या होवू नये म्ह्णून आधीच हे बेसन पाण्यात घोळून घ्यावं आणि मग रश्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावं. भाजी कोरडी असली तरी मीठ जास्त झालं म्हणून बेसनपीठ भाजून घालता येतं. भाजी आमटीत जास्त झालेलं मीठ कमी करण्याच्या या युक्त्या, आहेत की नाही एकदम सोप्या. त्या किती प्रभावी आहेत हे तुम्ही एकदा वापरुन बघितलं तर कळेलच!