मसाले हा आपल्या पदार्थांचा खास विशेष. विशिष्ट भाजीत आणि आमटीत अमूकच मसाला घालायचा, त्याचं प्रमाण हे ठरलेलं असतं. त्यामुळेच भाज्या आमट्या खाताना आपल्याला कंटाळा येत नाही. उलट मसाल्यांमधे थोडी अदलाबदल करुन त्यांना विशिष्ट चव देण्याचा प्रयत्न घरा घरात आणि बाहेर हॉटेलमधेही होतो. या प्रयत्नात सगळ्यात जास्त महत्त्व आहे तडक्याला. नेहमीप्रमाणेच तयार केलेल्या भाज्या, आमट्या यांना जरा वेगळ्या पध्दतीचा तडका दिला किंवा साध्या वरणाला विशेष तडका देऊन त्याची चव स्पेशल करता येते. तडका हा फक्त भाजी आमटीलाच नाही तर सांभार, इडली डोशाची चटणी, रायतं, कोशिंबीर यांना देखील देता येतो. तडका देऊन हे पदार्थ आणखी रुचकर करता येतात.
Image: Google
तडका ही एक प्रक्रिया झाली. पण यात साधा तडका ते स्पेशल तडका असे विविध प्रकार आहेत. जे स्वयंपाक करतात त्यांना आपण करतो ते सर्वच पदार्थ विशेष वाटतात. पण घरात खाणार्यांना मात्र ते तेच तेच वाटतात. त्यांना काही हवं असतं स्पेशल. आता रोज स्पेशल काय करणार? असा प्रश्न पडला असेल तर नेहमीची भाजी आमटी करा आणि तिला तडका मारा की झाला स्पेशल. तडक्याचे प्रकार वाचल्यावर एक प्रश्न मात्र तुम्हाला पडू शकतो, की आज कोणता तडका मारायचा बरं?
Image: Google
तडका मारके
1. हिंग जिर्याचा तडका
हिंग जिर्याचा तडका म्हणजे अगदी साधा तडका. मूग, मसूर, उडीद डाळीचं वरण किंवा साधं तुरीचं वरण याला आणखी चव आणण्यासाठी हा हिंग जिर्याचा तडका देता येतो. या तडक्यामुळे या डाळ आमट्या एकदम चवदार लागतात. हा तडका देण्यासाठी तेल किंवा तूप याचा वापर करता येतो. यामुळे चवीत फरक पडतो. हिंग जिर्याचा तडका देताना थोडं आलं किसून घातलं तर आणखी चव वाढते.
Image: Google
2. साउथ इंडियन तडका
साउथ इंडियन तडका म्हणजे स्पेशल तडका. हा तडका सांभार पासून चटणीपर्यंत, आप्पे आणि इडलीच्या मिश्रणालाही दिला जातो. या तडक्यानं या पदार्थांची लज्जत आणखीनच वाढते. साउथ इंडियन तडका देण्यासाठी एका कढईत तेल गरम करावं. त्यात मोहरी, अख्खी लाल मिरची, उडदाची डाळ आणि कढीपत्ता घालतात. तेलात टाकल्यावर ते थोडे तडतडले की हा तडका सांभार, चटणी किंवा इडली- आप्प्याच्या मिश्रणात टाकला जातो.
Image: Google
3. लसणाचा तडका
तळलेल्या लसणाची चव एकदम सही लागते. त्यामुळे मिळमिळीत भाज्या आणि आमटीची चवही खुलते. लसणाचा तडका देताना थोड्या लसणाच्या पाकळ्या घ्याव्यात. त्या मिक्सरमधून न वाटता पोळपाटावर ठेवून त्यावर दोन तीन वेळा लाटणं फिरवावं. किंवा छोटा खलबत्ता असल्यास लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात किंवा लसूण अगदी बारीक चिरावा. अशा प्रकारे वाटलेल्या/ बारीक कापलेल्या लसणाच्या तडक्याचा स्वाद कडक होतो. एका कढईत थोडं तेल घ्यावं. ते गरम करावं. यात ठेचलेला लसूण टाकावा. लसून हलवत राहावा. तो हलका सोनेरी व्हायला हवा. गरम तेलात ठेचलेला लसूण पटकन जळून उठतो आणि करपलेल्या लसणाची चव विचित्र लागते. तेलात ठेचलेला लसूण सोनेरी झाला की त्यात थोडं लाल तिखट घालावं. डाळ उकळत असताना हा तडका डाळीला द्यावा. डाळी खालचा गॅस बंद करुन डाळीच्या भांड्यावर झाकावं. थोड्या वेळ झाकण तसंच राहू द्यावं. यामुळे डाळीत लसणाच्या तडक्याची चव चांगली उतरते.
Image: Google
4. पंच फोरन तडका
हा तडका देताना मेथी दाणे, मोहरी, कांद्याचं बी ( कलौंजी), जिरे, बडिशेप या अख्ख्या मसाल्यांचा वापर केला जातो. हा तडका खास बंगाली पध्दतीचा आहे. डाळ, पातळ भाज्या आणि चटणी यांना पंच फोरन तडका देऊन स्वादिष्ट केलं जातं. उत्तर भारतात हाच तडका भोपळ्याची भाजी, कारल्याची भाजी यांना देतात. यासाठी कढईत तेल गरम करावं आणि त्यात हे पाच घटक एका मागोमाग टाकावेत. ते थोडे तडतडले की तडका लगेच ज्यात घालायचा आहे त्यात घालून भाजी /आमटी/ चटणी चांगली हलवून घ्यावी.
Image: Google
5. ढाबा स्टाइल तडका
आपल्या ढाब्यावरची डाळ खूप आवडते. कारण काय तर तिची चव. तशीच डाळ आपण घरी करुन बघितली तर मात्र ढाब्यासारखी चव लागत नाही. याचं कारण ढाब्याच्या डाळीत तडका असतो जो आपण घरी देत नाही.आता हा ढाबा स्टाइल तडका जमला की घरची डाळही ढाब्यासारखी चविष्ट लागेल.
ढाबा स्टाइल तडका हा डाळ फ्राय करताना किंवा उत्तर भारतीय प्रकारची डाळ केली तर वापरला जातो. शिजवलेल्या डाळीत आवश्यकतेनुसार पाणी मिसळून ती उकळली जाते. कढईत तेल किंवा तूप किंवा बटर घालून ते गरम केलं जातं. त्यात जिरे, हिंग, धने पावडर, लाल तिखट घातलं जातं. बारीक चिरलेला कांदा, टमाटा यात परतला जातो. किसलेलं आलं, ठेचलेला लसूण आणि बारीक कापलेली हिरवी मिरचीही या तडक्यात परतली जाते. हे सर्व चांगलं मिसळलं गेलं की हे मिश्रण उकळलेल्या डाळीत टाकतात.डाळीचा गॅस बंद करतात. डाळ चांगली हलवून घेतात आणि मग डाळीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकतात. हा असतो ढाबा स्टाइल तडका.