"हिच्या हातची भाजी एकदा खाऊन पहा... फार छान चवदार पदार्थ बनवते, खूप छान चव आहे हाताला.." अशी वाक्य आपण नेहमीच ऐकतो किंवा एखाद्याच्या बाबतीत आपणही असं बोलतो. नेमकं हाताला चव असणं ही काय भानगड आहे बुवा.. असंही कधीतरी आपल्याला वाटून गेलेलं असतं. पण हाताला चव असणं म्हणजे स्वयंपाकाची नजाकत समजलेली असणं. ज्याला भाजी किंवा एखादा पदार्थ बनविताना कोणता घटक कधी आणि किती टाकायचा, हे जर समजलं तर हमखास तो पदार्थ चवदार होणारच.
भाजी तर करायची आहे, त्यात काय एवढं ? असं म्हणणारेही खूप असतात. म्हणूनच तर भाजी बनविणारे खूप असतात. पण चवदार भाजी बनवणारं एखादंच कुणीतरी सापडतं. तुम्हालाही जर अशीच चवदार भाजी, वरण बनवायचं असेल आणि "काय चव आहे बुवा हिच्या हाताला..." अशी स्वत:ची स्तुती करवून घ्यायची असेल, तर मसाल्यांचं हे गणित नीट समजावून घ्या.
कोणता मसाला कधी टाकायचा?- कोणतीही भाजी बनविताना आपण सगळ्यात आधी कढईत तेल टाकतो. चला तर मग इथूनच सुरूवात करूया. आता सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या. ती म्हणजे कढई तापायला ठेवल्या ठेवल्या लगेच त्यात तेल टाकू नका. अधी कढई गरम होऊ द्या आणि त्यानंतरच त्यात तेल टाका.
- तेल पुरेसे गरम झाल्यावरच त्यात जिरे किंवा मोहरी घालावी. जिरे आणि मोहरी दोन्ही घालायचे असल्यास आधी मोहरी घाला. ती नीट तडतडली की मग त्यानंतरच जिरे घाला. जिरे जेव्हा लालसर होऊन तडतडतात, तेव्हा गॅस कमी करावा आणि कढईत हळद टाकावी.
- कांदा परतताना त्यात चुटकीभर मीठ आणि हळद पावडर घालावी. झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ येऊ द्यावी. कांद्याचा स्वाद अजूनच वाढतो.
- अद्रक लसूण पेस्ट घालायची असल्यास कांदा चांगला परतला गेल्यानंतरच टाका. त्यानंतर टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी टाका. कांदा आणि टोमॅटो एकत्र टाकून कधीच परतू नका.
- कांदा, टोमॅटो आणि भाज्या दोन ते तीन मिनिटे वाफवून घेतल्यानंतर आणि त्यांना थोडा मऊसरपणा आल्यानंतरच त्यात मसाले घालावेत. मसाला घातल्यानंतर भाजी काही काळ झाकून ठेवा. असे केल्याने मसाला भाज्यांमध्ये चांगला मुरतो आणि त्याचा स्वादही टिकून राहतो.
- गॅस बंद करण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे आधी गरम मसाला घालाव. तिखट आणि भाज्यांच्या इतर मसाल्यांसोबत कधीच गरम मसाला घालू नये. तो सगळ्यात शेवटी टाकावा.
- जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटणार नाही, तोपर्यंत मसाला परतणे थांबवू नका.
- भाजी झाल्यावर गॅस बंद करायच्या पाच मिनिटे आधी कोथिंबीर आणि कसूरी मेथी टाकावी.
- भाजीमध्ये कढीपत्ता टाकणार असाल, तर तो फोडणी केल्यावर लगेच टाकावा. कढीपत्त्याची पाने रंग बदलू लागली की कढीपत्ता चांगला परतला गेला आहे, असे समजावे.
- भाज्यांमध्ये मीठ कधी टाकावे, हा प्रश्न कायम अनेक जणींना पडलेला असतो. भाजी जेव्हा आपण परतायला टाकतो, तेव्हा त्यात लगेचच मीठ टाकावे आणि व्यवस्थित हलवून घ्यावे. त्यानंतर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.