अनेकदा आठवडा बाजार करताना भाज्या, कोथिंबीर याबरोबर मिरच्यांचाही साठा करून ठेवला जातो. मिरच्या चांगल्या राहाव्यात म्हणून हाताने त्यांची देठं तोडून टाकली जातात. मात्र नकळतपणे तोच हात डोळ्याला लागला तर जळजळ होते. यासाठी मिरची तोडताना, चिरताना पुढे दिलेल्या सोप्या टिप्स वापरा, जेणेकरून मिरचीचा त्रास होणार नाही.
ज्यांना मसालेदार जेवण आवडते त्यांच्या घरात हिरव्या मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हिरव्या मिरचीमुळे पदार्थ झणझणीत तर होतातच, शिवाय त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र इथे आपण मिरच्यांचा वापर करताना हाताला होणारी जळजळ आणि त्यावर उपाय जाणून घेणार आहोत.
मिरची चिरल्यावर हाताला जळजळ होऊ नये म्हणून हात लगेच धुवून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तेवढ्याने जळजळ थांबत नाही. त्याला जोड म्हणून पुढील उपाय करून बघा, जेणेकरून जळजळ दूर होऊन तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
सुरीला तेल लावा :
मिरची हाताने न तोडता सुरीने तोडा आणि सुरीला तेलाचे बोट फिरवून घ्या. त्यामुळे मिरचीचा तिखट रस सुरीला लागेल पण हाताला नाही, त्यामुळे हात जळ्जळणार नाही आणि काम सुरळीत पार पडेल.
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर :
मिरची कापण्यापूर्वी लिंबाच्या रसामध्ये किंवा व्हिनेगरमध्ये बोट बुडवून मग मिरची चिरावी. विशेषतः मिरचीचे लोणचे करताना मोठ्या प्रमाणात मिरच्या चिरून घ्याव्या लागतात, त्यावेळेस हा उपाय करावा.
हाताला तेल लावा :
काही जणांना सुरीला तेल लावले असता त्याचा वापर करताना अंगावर काटा येतो, अशावेळी उलट प्रक्रिया करावी, म्हणजेच सुरीला तेल लावायचे नसेल तर हाताला तेल लावून मिरची चिरून घ्यावी आणि मग हात साबणाने स्वच्छ धुवून टाकावेत.
गार पाण्यात हात बुडवून ठेवा :
मिरची चिरून झाल्यावर हाताची जळजळ होत असेल तर बर्फाचे पाणी किंवा फ्रिजमधील गार पाणी एका पसरट भांड्यात घेऊन त्यात हात बुडवून ठेवा, त्यामुळेही लवकर आराम पडेल आणि जळजळ थांबेल!