दिवाळीच्या दिवसांत गोड खाणं होतं म्हणून आवर्जून तिखट किंवा मसालेदार काहीतरी करण्याचा बेत केला जातो. झणझणीत, चमचमीत-तिखट पदार्थ म्हटले की आपोआप तोंडाला पाणी सुटते. तिखटाचे पदार्थ चविष्ट होण्यासाठी त्यात आवर्जून गरम मसाला वापरला जातो. लवंग, मिरे, दालचीनी, तेजपान, स्टार फूल, शाही जिरे, वेलदोडे, धणे, लाल मिरची असे एकाहून एक सुगंधी आणि चविष्ट मसल्यांना भाजून त्याची पावडर करून त्याचा गरम मसाला बनवला जातो. यातही गोडा मसाला, काळा मसाला, कांदा-लसूण मसाला असे बरेच प्रकार असतात (Kitchen tips to reduce excess Garam Masala from dish).
हा मसाला जेवढा चविष्ट लागतो तेवढाच तिखट आणि झणझणीतही असतो. हा गरम मसाला विकतचा असो किंवा घरी बनवलेला, मसाला प्रमाणात वापरला तरच त्याची मजा असते. तो कमी जास्त झाला तर मात्र पदार्थाला म्हणावी तशी चव येत नाही. मसाला कमी पडला तर ठीक पण जास्त झाला तर काहीच करता येत नाही. मग पदार्थाची चव बिघडते, घशात जळजळते. मसालेदार पदार्थामुळे पोटालाही त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय आपण इतक्या प्रेमाने केलेला पदार्थ कोणीच खात नाही. भाजीत मसाल्याचा झणकाही जास्त झाला तर तो जाणवू नये आणि भाजीची चवही बिघडू नये म्हणून प्रसिद्ध शेफ पंकज यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे मसाल्याचा झणका तर कमी होईलच शिवाय पदार्थाची चवही खराब होण्याऐवजी अजून वाढेल.
भाजीत जास्त झालेल्या मसाल्याचा झणका कमी करण्याचे उपाय
१) शिजून तयार झालेल्या भाजीत अर्धा लिंबू पिळून घ्यावा. लिंबाच्या आंबटपणामुळे झणका कमी होतो.
२) त्यानंतर त्यात अर्धा चमचा साखर घालावी. यामुळे पदार्थाला हलकासा गोडवा येतो. ज्यामुळे लिंबाचा आंबटपणा व झणका यात बॅलन्स होतो.
३) त्यानंतर यात एक चमचा शुद्ध साजूक तूप घालावे. हे सगळे पदार्थ भाजीत घातल्यावर नीट मिक्स करून मग ती भाजी पुन्हा गरम करावी. मग तुम्हालाही जाणवेल चुकून जास्त झालेल्या गरम मसाल्याचा झणका कसा कमी झाला आहे.