Join us  

श्रावणात कांदा लसूण वर्ज्य? भाज्यांना चव येण्यासाठी आणि रस्सा दाट होण्यासाठी 10 युक्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:00 PM

कांद्याशिवाय भाज्यांना चव येत नाही किंवा भाज्यांचा रस्सा दाट होत नाही हा केवळ गैरसमज आहे. कांदा लसणाशिवाय भाज्यांना चवही येते आणि भाज्यांचा रस्सा दाटही होतो. यासाठी स्वयंपाकघरातल्या काही युक्त्या आहेत.

ठळक मुद्दे भाजीचा रस्सा दाटसर करण्यासाठी टमाट्याच्या प्युरीमधे गव्हाचं पीठ किंवा थोडा मैदा घातल तरी चालतो.भाजलेलं बेसन पाण्यात घालून ते फेटून मग भाजीत घालावं.भाजीचा रस्सा दाट करण्यासाठी उकडलेला बटाटा, गाजर, टमाटा, मुळा, कोबी, भोपळा यांचा वापर करता येतो.छायाचित्रं- गुगल

श्रावणात अनेक घरात कांदा लसूण खाणं वर्ज्य मानलं जातं.पण या एक महिन्यात अनेकजणींची खूपच पंचाईत होते. कांदा लसणाशिवाय भाज्यांना चव कशी येईल, भाज्यांचा रस्सा दाट कसा होईल असा प्रश्न पडतो. कांद्याशिवाय भाज्यांना चव येत नाही किंवा भाज्यांचा रस्सा दाट होत नाही हा केवळ गैरसमज आहे. कांदा लसणाशिवाय भाज्यांना चवही येते आणि भाज्यांचा रस्सा दाटही होतो. यासाठी स्वयंपाकघरातल्या काही युक्त्या आहेत.

छायाचित्र- गुगल

कांद्याशिवाय भाज्या करताना..

1. भाजीचा रस्सा दाटसर करण्यासाठी त्यात घट्ट आणि ताजं दही घालावं. दह्यामुळे रस्सा दाट तर होतोच शिवाय भाजीला छान चवही येते.

2. टमाट्याच्या प्युरीत शेंगदाणे वाटून एकत्र करुन हे मिश्रण जर भाजीत घातलं तर रस्सा दाटसर होतो.

3. जर शेंगदाणे वापरायचे नसतील तर बदाम वाटून बदामाची पूड टमाट्याच्या प्युरीत एकत्र करुन भाजीत घालावी. बदामाच्या पेस्टमुळेभाजीला छान चव येते आणि रस्सा हवा तेवढा दाटसर करता येतो.

4. रस्सा दाट करायचा असेल तर काजू वाटून त्याची पेस्ट भाजीला लावता येते. पण नेहेमी रस्सा दाट होण्यासाठी काजू वापरणं आरोग्यासाठी योग्य नसतं. रस्सा दाट करण्यासाठी मगज बियांचाही वापर करता येतो.

छायाचित्र- गुगल

5. भाजीचा रस्सा दाटसर करण्यासाठी टमाट्याच्या प्युरीमधे गव्हाचं पीठ किंवा थोडा मैदा घातल तरी चालतो. फक्त कणीक आणि मैदा घालणार असाल तर ते आधी कोरडं भाजून घ्यायला हवं. थोड्याशा तेलात कणीक किंवा मैदा भाजून घ्यावा नंतर त्यात टमाट्याची प्युरी घालावी. हे मिश्रण दाटसर झालं की मग ते भाजीत घालावं. रस्सा दाट होतो.

6. थोडी कोबी चिरावी आणि ती पाण्यात उकळावी.ही उकळलेली कोबी वाटून ती भाजीत घालावी. याचप्रमाणे थोडा भोपळा चिरुन तो पाण्यात उकडून वाटून भाजीत घातला तर भाजीला चव येते तसेच रस्साही दाटसर होतो.

7. भाजी चविष्ट करण्यासाठी आणि भाजीचा रस्सा दाटसर करण्यासाठी दोन चमचे बेसनपीठ भाजून घ्यावं. आणि भाजलेलं बेसन पाण्यात घालून ते फेटून मग भाजीत घालावं.

8.ब्रेडचे तुकडे बारीक वाटून ही ब्रेडची पूड जर भाजीत घातली तर रस्सा दाटसर होतो.

9. भाजीचा रस्सा दाटसर करण्यासाठी बटाटा उकडून घ्यावा आणि तो किसून मग भाजीत घालावा.

10. केवळ टमाट्याची प्युरी करुन ती भाजीत घातली तरी रस्सा दाटसर होतो. हवं तर टमाट्यासोबत गाजर किंवा थोडा मुळा वाटावा आणि हे मिश्रण भाजीला लावावं.