दिवाळी म्हटली की डोळ्यासमोर थंडीचे दिवस येतात. थंडीच्या दिवसांत आरोग्याला ऊर्जेची, उष्णतेची किंवा स्निग्धतेची आवश्यकता असल्याने दिवाळीत अभ्यंग स्नान, फराळाचे पदार्थ यांची परंपरा आहे. आपल्या सगळ्या सण-उत्सवांना धार्मिकतेबरोबरच शास्त्रीय गोष्टींचीही जोड असते. त्यामुळे प्रत्येक सणामागील परंपरा ही आरोग्याशी निगडीत असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे दिवाळी हा थंडीत येणारा वर्षातील मोठा सण असल्याने तो घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. थंडीच्या दिवसांत खाल्लेले चांगले पचत असल्याने दिवाळीत गोड, तळलेले खाण्याची किंवा भेट म्हणून सुकामेवा देण्याची पद्धत आहे. पण यंदाच्या दिवाळीत राज्यातील बऱ्याच शहरांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने थंडी कुठच्या कुठे पळाली आहे. दमट-ढगाळ हवामान आणि पुणे-नाशिकसारख्या शहरांत कोसळणारा जोरदार पाऊस यामुळे दिवाळीची मजा काही प्रमाणात नक्कीच कमी होण्याची शक्यता आहे (Know How to Keep Diwali Faral Moisture free even if its raining outside).
या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीसाठी आपण करत असलेले पदार्थ सादळण्याची भिती यामुळे महिलांच्या मनात डोकावू लागली आहे. महिलावर्ग दिवाळीच्या आधीच ८ ते १० दिवसांपासून दिवाळीच्या फराळाची तयारी करायला सुरुवात करतात. यामध्ये चकलीच्या भाजणीपासून ते शेव, चिवडा असे कुरकुरीत बरेच पदार्थ केले जातात. त्याशिवाय शंकरपाळे, करंज्या हे गोडाचे पदार्थही सादळण्याची शक्यता या पावसामुळे निर्माण झाली आहे. हे सगळे पदार्थ कुरकुरीत असतील तरच छान लागतात. पण ते सादळले तर मात्र त्यातली मजा निघून जाते. तसेच पावसाळी वातावरणामुळे पदार्थांना डब्यात नीट ठेवलेले असतील तरी बुरशी किंवा भुरा लागण्याची शक्यता असते. मात्र कष्टाने केलेल्या फराळाच्या पदार्थांचे असे काही होऊ नये यासाठी कोणते उपाय करावेत पाहूया...
१. पावसाळी हवेत चिवडा, चकली, शेव हे पदार्थ वातड, चिवट होऊ नयेत यासाठी हे पदार्थ थेट डब्यात न ठेवता प्लास्टीकच्या पिशवीत भरा. त्यानंतर ही पिशवी रबराने किंवा पूर्णपणे लॉक होईल अशा पद्धतीने बंद करा. आता ही बंद केलेली पिशवी घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा. यामुळे त्याला अजिबात हवा लागणार नाही आणि पदार्थ दिर्घकाळ कुरकुरीत राहण्यास मदत होईल. झिपलॉकच्या पिशव्या किंवा क्लिप्स यासाठी उपयुक्त ठरतात.
२. डब्यात पिशवी ठेवली की त्याच्या आजुबाजूला आणि वरच्या बाजुने थोडे तांदूळ घाला. तांदळामुळे हवेतील दमटपणा शोषला जातो आणि आतले पदार्थ चिवट न होता कुरकुरीत राहण्यास मदत होते.
३. चिवडा, शेव किंवा काहीही घेताना आपले हात किंवा चमचा ओलसर नसेल याची आवर्जून काळजी घ्यायला हवी. कामाच्या गडबडीत आणि हात धुतो आणि पटकन त्याच हाताने डब्यातील पदार्थ घ्यायला लागतो. पण हा थोडासा ओलसरपणाही चिवडी किंवा चकल्या साधळण्यासाठी पुरेसा असतो. त्यामुळे हात, चमचा ओला नसेल याची खात्री करा.
४. कपाट किंवा ट्रॉलीमध्ये फराळाचे पदार्थ न हे डबे शक्यतो मोकळ्या हवेत मात्र पूर्ण बंद राहतील याची काळजी घ्या. आधीच हवेत दमटपणा असतो, त्यात पावसाळी वातावरणामुळे हा दमटपणा वाढतो आणि त्यात आपण हे पदार्थ खूप बंद ठेवले तर त्याला बुरशी येण्याची किंवा ते पटकन खराब होण्याची शक्यता असते.