Join us  

घरीच चक्का आणि श्रीखंड करण्याची घ्या सोपी रेसिपी, दसऱ्याला करा खास बेत- रेडिमेड श्रीखंड विसराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 4:15 PM

Know How To make Chakka and Shrikhand at Home for Dasara : रेडीमेड पदार्थ आणणे सोपे असले तरी त्या पदार्थाला घरातील व्यक्तींनी प्रेमाने आणि कष्ट घेऊन केलेल्या पदार्थांची सर नक्कीच येणार नाही.

श्रीखंड किंवा आम्रखंड हे आपल्याकडील एक आवडते मिष्टान्न, दुधापासून दही, दह्यापासून चक्का आणि या चक्क्यापासून केले जाणारे श्रीखंड हा अनेकांचा विक पॉईंट. दसऱ्याला उकाडा असल्याने तर अनेक कुटुंबांमध्ये श्रीखंड करण्याची पद्धत आहे. दसरा हा वर्षातील मोठ्या सणांपैकी एक सण असल्याने या दिवशी आवर्जून श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेलची आणि केशर घातलेले हे श्रीखंड प्रिय असल्याने आवडीने खाल्लेही जाते. श्रीखंड किंवा आम्रखंड विकत आणायचे म्हटल्यास ते अतिशय महाग असते तसेच त्यामध्ये कोणते जिन्नस घातलेले आहेत हे सांगता येत नाही. त्यामुळे काही जणांकडे परंपरेप्रमाणे घरीच श्रीखंड करण्याची पद्धत आहे (Know How To make Chakka and Shrikhand at Home for Dasara). 

पूर्वी प्रत्येक गोष्ट घरातच केली जायची. विकत मिळण्याची पद्धत तेव्हा नव्हतीच. त्यामुळे घरातच दह्याचा चक्का करणे, तो खुंटीला टांगून मुरवायलवा ठेवणे, त्यामध्ये साखर घालून तो कितीतरी वेळ घोटणे अशा सगळ्या गोष्टी घरात केल्या जात. पण जसा काळ बदलला तशा स्त्रियाही घराबाहेर पडू लागल्या आणि सध्या तर बहुतांश गोष्टी या रेडिमेड मिळायला लागल्या. रेडीमेड पदार्थ आणणे सोपे असले तरी त्या पदार्थाला घरातील व्यक्तींनी प्रेमाने आणि कष्ट घेऊन केलेल्या पदार्थांची सर नक्कीच येणार नाही. त्यामुळे यंदा दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हीही घरच्या घरी श्रीखंड ट्राय करु शकता. त्यासाठी दह्यापासून चक्का करणे आणि मग श्रीखंड हे कसे करायचे पाहूया.... 

(Image : Google )

१. सगळ्यात आधी घट्टसर दही एका स्वच्छ कापडात बांधून ठेवा. या दह्यातील पाण्याचा अंश निघणे महत्त्वाचे असल्याने ते वरच्या बाजूला टांगलेले राहील अशापद्धतीने एखाद्या सुती कापडात ठेवा. 

२. साधारणपणे आदल्या दिवशी रात्री ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यातील पाणी कापडातून खाली पडते किंवा कापडात शोषले जाते आणि ते पूर्णपणे कोरडे होण्यास मदत होते.

३. हे कापड दुसऱ्या दिवशी काढून त्यातील दही कापडासकट पिळून घ्या. पाण्याचा अंश कमी झाल्यावर त्याचा चक्का तयार होतो. हा चक्का एका भांड्यात काढा. त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घालून सगळे एकजीव फेटून घ्या. 

(Image : Google )

४. काहीवेळ हे मिश्रण मुरण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर हा चक्का पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. दह्याच्या गाठी आणि साखर अगदी मऊ होईपर्यंत फेटा. पूर्वी मिक्सर नव्हते तेव्हा हा चक्का आणि साखर हातानेच फेटली जायची. कित्येक तास हाताने हे दोन्ही एकत्र करुन रात्रभर तसेच ठेवल्यानंतर दुसऱ्यादिवशी साखर आणि चक्का एकजीव होते. तुम्हालाही श्रीखंडात थोड्या गुठळ्या आवडत असतील तर तुम्ही मिक्सरपेक्षा हातानेही ढवळू शकता. आवडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी-जास्त करु शकता. 

५. एका वाटीत दूध घेऊन केशर आणि वेलची पावडर मिसळा आणि दुधात छान केशरी रंग आल्यानंतर हे दूध दह्यात घाला आणि चमच्याचे व्यवस्थित एकत्र करा. आता त्यात आवडीनुसार बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. 

६. घरच्या घरी तयार झालेले हे श्रीखंड गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. आवडीनुसार यामध्ये आंब्याचापल्प घालून आम्रखंड करु शकता. तसेच हल्ली अनेकांना फ्रूट घातलेले फ्रूटखंडही किंवा ड्रायफ्रूटखंडही आवडते. त्यासाठी तुम्हाला आवडतील त्या फळांच्या फोडी किंवा सुकामेव्याचे काप यामध्ये घाला.  

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३अन्ननवरात्रीदसरा