Join us  

घरीच तयार करा मिसळच्या तर्रीचा परफेक्ट मसाला; पावसाळ्यात झणझणीत मिसळीचा करा बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2023 12:02 PM

Know How To Make Misal Masala At Home : हा मसाला अगदी सोप्या पद्धतीने घरी कसा तयार करायचा पाहूया...

मिसळ हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ अनेकांचा विक पॉईंट असतो. थंडीच्या दिवसांत किंवा बाहेर मस्त पाऊस पडत असताना झणझणीत तर्री असलेली मिसळ म्हणजे तर सुखच. हल्ली गोवागोवी आणि अगदी मैलामैलावर वेगवेगळ्या चवीची आणि पद्धतीची मिसळ मिळते. कधी या मिसळमध्ये नुसतंच फरसाण असतं तर कधी खूप चिवडा. त्यामुळे आपल्याला ती मिसळ आवडतेच असं नाही. पण मिसळची मूळ चव ही तिच्या तर्रीमध्ये असल्याने या तर्रीचे गणित एकदा छान जमले की त्यात फारसे अवघड काही नाही (Know How To Make Misal Masala At Home).

मटकी किंवा मिक्स कडधान्यांची उसळ, पोहे, बटाटा, फरसाण, चिवडा, भरपूर कांदा आणि कोथिंबीर आणि तर्री असे सगळे एकत्रित केल्यावर होणारी ही मिसळ काही जण कोणत्याही प्रहरी खाऊ शकतात. पावसाळ्याच्या दिवसांत बाहेर मिसळ खाण्यापेक्षा घरीच विकेंडला मिसळीचा बेत करायचा असेल तर तर्री परफेक्ट होण्यासाठी त्याचा मसालाही तसाच हवा. हा मसाला अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करता येतो. तो कसा करायचा पाहूया ....

(Image : Google)

साहित्य - 

१. तेल - १ चमचा

२. कांदा - १ 

३. खोबरं - अर्धी वाटी

४. लसूण - १० ते १२ पाकळ्या

५. आलं - १ इंचाचा तुकडा

६. लाल मिरच्या - ४ ते ५ काश्मिरी आणि ४ ते ५ बेडगी मिरची

७. काळी मिरी - १० ते १२ 

८. लवंग - ७ ते ८ 

९. काळी वेलची - १ 

१०. वेलदोडे - ८ ते १०

११. दालचिनी- १ इंच काडी 

१२. जीरे - १ चमचा 

१३. बडीशोप - १ चमचा 

(Image : Google)

१४. तीळ - १ चमचा 

१५. धणे - पाव चमचा 

१६. खसखस - अर्धा चमचा

१७. सुंठ पावडर - १ चमचा 

१८. सैंधव मीठ - १ चमचा 

१९. हिंग - अंदाजे 

कृती -

१. पॅनमध्ये तेल घालून त्यात कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. 

२. त्यानंतर त्यात किसलेले खोबरे, लसूण पाकळ्या आणि आलं घालून चांगले रकतून घ्या.

३. हे मिश्रण एका ताटलीत काढून घेऊन त्यानंतर याच कढईत सगळ्या मिरच्या चांगल्या परतून ताटलीत काढून घ्या.

४. हाच पॅन कोरडा करुन त्यात काळी मिरी, लवंग, दोन्ही प्रकारचे वेलदोडे, दालचिनी, जीरे, बडीशोप, धणे, तीळ सगळे घालून ते चांगले भाजून घ्या. 

५. यामध्ये खसखस, मीठ, सुंठ पावडर, हिंग घालून हे मिश्रण पुन्हा चांगले परता. 

६. थोडे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन याची थोडी जाडसर पूड करुन घ्या. 

७. ही पूड झाल्यावर त्यातच भाजलेल्या मिरच्या आणि आलं, लसूण कांदा घालून ते पुन्हा मिक्सरवर फिरवा. 

८. खमंग वासाचा मिसळ मसाला तयार झाला की त्याची मस्त तर्री बनवा आणि मिसळीचा झक्कास बेत करा.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.