Join us  

१ वाटी तांदूळाच करा मऊ-लुसलुशीत ढोकळा; १० मिनिटांत करा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2023 2:17 PM

Know how to make rice dhokla easy and healthy recipe : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून होणारी चविष्ट रेसिपी...

मुलांना सतत खाऊच्या डब्याला किंवा मधल्या वेळेत खायला काय द्यायचं असा प्रश्न आपल्या सगळ्याच महिला वर्गाला पडतो. तसंच नाश्त्यालाही सतत वेगळं काय करायचं तेही कळत नाही. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासूनच अगदी झटपट आणि तरीही चविष्ट होईल असा पदार्थ आपल्याला कोणी सांगितला तर? तांदळापासून आपण साधारणपणे भात, फारतर इडली, डोसा, आप्पे हे पदार्थ करतो. ढोकळा म्हटला की साधारणपणे आपल्याला डाळीच्या पीठाचा पिवळ्या रंगाचा ढोकळा आठवतो. पण तांदळाचा ढोकळा आपण क्वचितच केला असेल. अतिशय चविष्ट लागणारा आणि झटपट होणारा हा पांढराशुभ्र मऊ-लुसलुशीत ढोकळा नेमका कसा करायचा पाहूया (Know how to make rice dhokla easy and healthy recipe)…

१. साधारण १ वाटी तांदूळ रात्रभर किंवा ५ ते ६ तास पाण्यात भिजत घाला.

२. हे तांदूळाचे पाणी काढून घेऊन त्यामध्ये १ वाटी दही घाला आणि हे दोन्ही मिक्सरवर चांगले बारीक करुन घ्या.

(Image : Google )

३. यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी रवा आणि चवीपुरते मीठ घाला. 

४. बारीक चिरलेल्या मिरच्या आणि किसलेलं आलं घाला.

५. एका लहान कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, जीरे आणि कडीपत्ता घालून ही फोडणी या मिश्रणावर घाला.

६. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे पीठ चांगले एकजीव करुन घ्या.

७. अर्धा तास पीठ झाकून पुन्हा भिजण्यासाठी ठेवा.

८. त्यानंतर या पीठात इनो घालून वरुन थोडेसे पाणी घाला आणि पीठ एकजीव करा. 

९. एका थाळीला तेल लावून त्यावर हे पीठ पसरा आणि आवडीप्रमाणे यावर थोडे लाल तिखट भुरभुरा.

१०. कुकरमध्ये किंवा कढईत पाणी तापवून त्यामध्ये ही थाळी १० मिनीटांसाठी झाकून ठेवा. 

११. साधारण १० मिनीटांनी गॅस बंद करुन थाळी बाहेर काढा आणि गार झाल्यावर याचे चौकोनी काप करा. 

१२. आवडीप्रमाणे यावर वरुन कोथिंबीर, खोबरं, फोडणी घालू शकता. चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी यासोबत हा ढोकळा अतिशय चविष्ट लागतो.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.