Join us  

रोजच्या पोळीला द्या १ एकदम सोपा पौष्टिक ट्विस्ट, रोजची पोळीभाजी खाऊनही मिळेल भरपूर पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 4:00 PM

Know How To Make Roti Or Paratha More Nutritious 5 Easy Tips : पोळीतून जास्त पोषण मिळावे यासाठी सोपे पर्याय...

पोळी भाजी हे महाराष्ट्रातील विशेषत: शहरी भागातील प्रमुख अन्न. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच डब्यात पोळी-भाजी नेतात. पोटभरीचे आणि पौष्टीक असल्याने पोळी भाजीला मान्यताही आहे. गव्हामध्ये फायबर आणि इतरही काही घटक असतात. त्यामुळे पोळी-भाजीतून शरीराचे पोषण होतेच, पण हेच पोषण थोडे जास्त व्हावे यासाठी पोळीमध्ये अगदी छोटे बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन्सची आवश्यकता असते. तसेच पोळीतून जास्त पोषण मिळावे यासाठी पोळी करतानाच त्यामध्ये काही घटक घातल्यास त्याचा चांगला फायदा होतो. पाहूयात यासाठी नेमके काय करायचे (Know How To Make Roti Or Paratha More Nutritious 5 Easy Tips)...

१. तीळ 

पोळी लाटताना गोळ्यामध्ये थोडे तीळ घातले तर शरीराला जास्तीचे कॅल्शियम आणि चांगले फॅटस मिळण्यास मदत होते. तसेच तीळाची चवही छान लागते. 

(Image : Google)

२. शेवग्याच्या पानांची पावडर

शेवग्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे गुणधर्म असतात हे आपल्याला माहीत आहे. बाजारात शेवग्याच्या बियांपासून केलेली पावडर मिळते. पोळी लाटताना त्यावर तूप आणि ही पावडर पसरुन पोळी लाटावी. त्यामुळे पोळीची पौष्टीकता वाढण्यास मदत होते. 

३. तूप आणि दाण्याचा कूट

पोळी भाजून झाल्यावर त्यावर भरपूर तूप आणि दाण्याचा कूट किंवा दाण्याची चटणी घातल्यास ती अतिशय छान लागते. तसेच शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असल्याने पोषण मिळण्यासाठीही हा उत्तम पर्याय असतो. 

४. रोस्टेड ओटस किंवा जवस

कणीक मळतानाच त्यामध्ये ओटस भाजून त्याची पावडर करुन टाकता येऊ शकते. यामुळे फायबर कंटेंट वाढतो. तसेच जवसाची पूड करुन तिही या पिठात घातली तरी पोळी चवीला फारशी बदलत नाही पण पौष्टीकता निश्चितच वाढण्यास मदत होते. 

५. पालक, बीट किंवा अन्य भाज्या

कणीक मळताना त्यात पालकाची प्युरी, बिटाची प्युरी टाकल्यास मुलं भाज्या खात नसतील तर नकळत त्याही पोटात जातात. वेगळा रंग आल्याने लहान मुले हे पराठे आवडीने खातात. याशिवाय कोबी, गाजर, मुळा, दुधी भोपळा यांसारख्या भाज्याही पीठात किसून घालता येऊ शकतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आहार योजना