बाहेर काही खायचं असेल पण तळलेलं किंवा मसालेदार नको असेल अशावेळी आपण साऊथ इंडियन किंवा सँडविच खाणे पसंत करतो. प्रवासात तर पोटाचा काही त्रास होऊ नये यासाठी अनेक जण सँडविच खाण्याला पसंती देतात. अनेकदा बाहेरचे नको म्हणून आपण घरीही सँडविच करतो. पण ब्रेड हा सँडविचसाठी वापरला जाणारा मुख्य घटक असतो. आणि हा ब्रेड मैद्याचा असल्याने तो आरोग्यासाठी चांगला नसतोच. कधीतरी मैदा खाणे ठिक आहे (know how to make Sandwich Without bread by chef kunal kapur).
पण यिस्ट आणि मैद्याचा वापर करुन तयार करण्यात येणारा ब्रेड आरोग्यासाठी विशेष चांगला नसतोच. त्यामुळे लठ्ठपणा, शुगर, कोलेस्टेरॉल, पचनाशी निगडीत समस्या यांसारख्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मग सँडविच आवडते पण ब्रेड तर खायचा नाही अशावेळी ब्रेडशिवाय सँडविच कसे करायचे याची सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी ही टेस्टी तरीही हेल्दी अशी ब्रेडविना सँडविचची रेसिपी सांगितली असून ते कसं करायचं पाहूया...
१. साधारण २ वाट्या रवा, अंदाजे मीठ, १ वाटी दही आणि १.५ वाटी पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करुन घ्यावे.
२. एका पॅनमध्ये साधारण ३ चमचे तेल घेऊन त्यामध्ये हिंग आणि २ लाल मिरच्या आणि बारीक केलेलं आलं घाला . त्यात १ चमचा उडीद डाळ आणि १ चमचा चणा डाळ घालून चांगले परतून घ्या.
३. मग यामध्ये मोहरी आणि कडीपत्ता आवडीनुसार हिरवी मिरची घालून ही फोडणी रव्याच्या मिश्रणात घाला आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडा सोडा घाला.
४. टोस्टरमध्ये ब्रेड ठेवतो त्याठिकाणी हे रव्याचे मिश्रण तेल लावून सगळीकडे एकसारखे घालून घ्या.
५. यावर चीज किंवा आपल्याला आवडतील त्या भाज्या घालून टोस्टर गॅसवर चांगले गरम करुन घ्या.
६. हे चीज किंवा व्हेज सँडविच चटणी, सॉससोबत अतिशय छान लागते.