भारतात प्रत्येक सणाला आणि त्यावेळी केल्या जाणाऱ्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. कोजागरी पौर्णिमाही त्यातीलच एक. अश्विन पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी देवाला आणि चंद्राला मसाला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. इतकंच नाही तर प्रसाद म्हणून हे दूध किंवा या दुधापासून केलेली खीर आवर्जून खाल्ली जाते. चंद्राचं प्रतिबिंब पाहत हे गरम दूध पिणं म्हणजे एक छानसा बेतच असतो (Kojagiri purnima special masala doodh recipe making tips).
पावसाळ्यातून हिवाळ्याचा ऋतूबदल होत असताना अशाप्रकारे गरम दूध पिणं आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असतं. हिवाळ्यात शरीराला ताकदीची आवश्यकता असते. तसेच पावसाळ्यात होणारी इन्फेक्शन्स या मसाल्यातील पदार्थांमुळे दूर होण्यास मदत होते. आता मसाला दूधच तर आहे, त्यात काय विशेष करण्यासारखं असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण हे दूध नेहमीच्या मसाला दुधापेक्षा चवदार व्हावे यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. त्यामुळे या दुधाला आई-आजीच्या हाताची पारंपरिक चव येते.
१. दुधाला घट्टपणा येण्यासाठी..
मसाला दूध हे थोडे दाटसर असेल तरी छान लागते. काही जणांना पातळ दुध पिण्यापेक्षा असे मलाईदार दूध पिणे आवडते. दूध असं घट्ट व्हावं यासाठी ते थोडं आटवलं तर घट्ट होण्यास मदत होते. घट्टपणा येण्यासाठी हे दूध सायीसकट घ्यायला हवे. याशिवाय दुधामध्ये गरम करताना थोडी मिल्क पावडर घातली तरी दूध घट्टसर होते. सुकामेव्याचे काप तर आपण दुधात घालतोच पण त्यासोबतच थोड्या सुकामेव्याची पावडर केली आणि ती यामध्ये घातली तरी दुधाला घट्टपणा येतो.
२. सुकामेवा घालताना..
मसाला दूध म्हणजे सुकामेव्याला विशेष महत्त्व असते. हा सुकामेवा छान एकसारखा कापला तर दिसायला तर छान दिसतोच पण त्याचे काप खायलाही छान लागतात. हल्ली बाजारात सुकामेवा कापण्यासाठी लहान आकाराची बरीच यंत्र मिळतात, त्यामध्ये सुकामेवा एकसारखा कापला तर छान वाटते. यात प्रामुख्याने काजू, बदाम आणि पिस्ते यांचाच समावेश करावा. आवडीनुसार चारोळ्या घातल्या तरी चालतात मात्र त्या किडक्या नसाव्यात याची खात्री करुन घ्यायला हवी.
३. मसाले हवेतच
दुधाची पौष्टीकता वाढण्यासाठी आणि त्याला फ्लेवर येण्यासाठी त्यामध्ये काही जिन्नस आवर्जून घालायला हवेत. यात वेलची पूड, केशर, हळद, सुंठ पावडर यांचा समावेश करायला हवा. आवडीनुसार यामध्ये दालचिनी पूड, बडीशेप यांचाही समावेश केल्यास या दुधाला नेहमीपेक्षा थोडा वेगळा फ्लेवर येतो. हे सगळे मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. पावसाळा आणि हिवाळा याच्या मधल्या काळात प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी हे फायदेशीर असते.