कोजागरी पौर्णिमापौर्णिमा (Kojagiri Pournima 2022) म्हटलं की घरोघरी मसाला दूध तयार केलं जातं. काही जणं मसाला दूध करायच्या नावाखाली दूध एवढं जास्त आटवतात की मग ते मसाला दूध कमी आणि रबडी किंवा बासुंदीच जास्त वाटू लागते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे दूध करतो, ते खूप जास्त किंवा खूप कमी आटवून उपयोग नाही. त्याचा परफेक्ट अंदाज तर आला पाहिजेच, शिवाय त्यात मसालाही अगदी योग्य चवीचा आणि योग्य प्रमाणात पडला पाहिजे. म्हणूनच यंदा कोजागरी पौर्णिमेला घरीच दूध मसाला तयार करून बघा. विकतचा मसाला तसाही खूपच महाग मिळतो. त्या महागड्या मसाल्यापेक्षा घरात तयार केलेला (How to make milk masala at home?) ताजा दूध मसाला कधीही उत्तमच. बघा ही सोपी रेसिपी (Healthy and flavoured milk masala recipe).
कसा तयार करायचा दूध मसाला
साहित्य
पाव कप काजू, पाव कप पिस्ता, पाव कप बदाम, अर्धे जायफळ, ८ ते १० वेलची, १ टेबलस्पून साखर, अर्धा टीस्पून बडिशेप,
८ ते १० मिरे, १० ते १२ केशरच्या काड्या, अर्धा टीस्पून सुंठ पावडर, दिड टेबलस्पून मिल्क पावडर.
रेसिपी
१. सगळ्यात आधी काजू, पिस्ता आणि बदाम मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे भाजून घ्या. आणि त्यानंतर ते पुर्णपणे थंड होऊ द्या.
२. त्यानंतर जायफळ, वेलची,बडिशेप, मिरे आणि अर्धा टेबलस्पून साखर मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर करून घ्या.
३. आता भाजलेला सुकामेवा मिक्सरमध्ये टाकून त्याचीही पावडर करून घ्या.
तांदुळावर प्लास्टिक कोटिंग तर नाही? बघा तांदळातली भेसळ ओळखण्याच्या ४ टिप्स
४. सुकामेव्याची पावडर आणि आधी तयार केलेली पावडर एका भांड्यात एकत्र करा. त्याता केशर, अर्धा टी- स्पून सुंठ पावडर आणि दिड टेबलस्पून मिल्क पावडर टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवा, दूध मसाला तयार.
कसा वापरायचा दूध मसाला?
२ कप दूध गरम करायला ठेवा. त्यात चवीनुसार साखर टाका. दूधाला ४ ते ५ मिनिटे उकळलं की त्यात दूध मसाला टाका. एक कपसाठी एक टेबलस्पून मसाला एवढं प्रमाण ठेवावं. पुन्हा ४ ते ५ मिनिटे दूध उकळू द्या. मसाला दूध तयार.