Join us  

न निवडता, न चिरता ५ मिनिटांत करा हिरव्यागार कोथिंबीरीची कुरकुरीत भजी; थंडीत हेल्दी-गरमागरम बेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2023 11:33 AM

Kothimbir Coriander Pakoda Bhaji Recipe : थंडीत छान हिरवीगार कोथिंबीर अगदी १० रुपयांत मिळते...

ठळक मुद्देलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकतील अशी ही भजी करायला फक्त ५ मिनीटे लागतात.१० रुपयांच्या कोथिंबीर जुडीत खा गरमागरम भारपूर कोथिंबीर भजी...

कोथिंबीर आरोग्यासाठी अतिशय चांगली असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असलेली कोथिंबीर आपण स्वयंपाकात आवर्जून वापरतो. एखाद्या पदार्थावर हिरवीगार कोथिंबीर घातली की त्या पदार्थाचा स्वाद नक्कीच वाढतो. थंडीच्या दिवसांत बाजारात सगळ्याच भाज्या भरपूर प्रमाणात आणि कमी किमतीत मिळत असल्याने या काळात भाजीपाला, फळं जास्त खाल्ली जातात. पालेभाज्या, सलाड, कंदमुळं सगळंच या काळात चांगलं मिळते, त्यामुळे आणलंही जातं. अगदी १० रुपयांत मिळणारी मोठी कोथिंबीरीची जुडी आपण आणतो खरी, पण वेळेत वापरली नाही तर ती वाळून जाते (Kothimbir Coriander Pakoda Bhaji Recipe). 

आपण कोथिंबीरीच्या वड्या, कोथिंबीरीचे सूप किंवा आणखी काही ना काही पदार्थ करतो. पण कोथिंबीरीची भजी आपण क्वचितच ट्राय केली असतील. विशेष म्हणजे ही रेसिपी इतकी खास आहे की यामध्ये कोथिंबीर निवडावी लागत नाही आणि चिरावीही लागत नाही. ही भजी अगदी झटपट होत असल्याने आणि थंडीच्या दिवसांत गरम खावेसे वाटत असल्याने उत्तम पर्याय आहे. चहाच्या वेळेला किंवा जेवतानाही तोंडी लावायला म्हणून हा चांगला पर्याय होऊ शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाऊ शकतील अशी ही भजी करायला फक्त ५ मिनीटे लागतात. पाहूया ही भजी करण्याची सोपी झटपट रेसिपी...

साहित्य - 

१. कोथिंबीर - १ जुडी 

२. बेसन - १ वाटी 

३. मीठ - चवीनुसार 

४. ओवा - पाव चमचा 

५. तिखट - पाव चमचा 

६. तेल - २ वाट्या 

कृती - 

१. कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याची माती काढून घ्यायची.

२. बेसन पीठात मीठ, ओवा, तिखट घालून थोडं पाणी घालून भजीला भिजवतो तसे घट्टसर पीठ भिजवायचे. 

३. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवायचे.

४. धुतलेली कोथिंबीर या पिठात भिजवायची आणि तळायला तेलात सोडायची.

५. चांगली खरपूस तळल्यावर झाऱ्याने बाहेर काढायची आणि थोडी गार झाल्यावर ही गरमागरम भजी खायची. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.