थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच त्या अतिशय कमी दराला मिळत असल्याने जास्तीत जास्त भाज्या खायला हव्यात. उन्हाळा किंवा पावसाळ्यात ३० ते ४० रुपयांना मिळणारी कोथिंबीर थंडीच्या दिवसांत ५ ते १० रुपयांना गड्डी मिळते. तिही अतिशय ताजीतवानी आणि हिरवीगार असल्याने आपणही अगदी सहज ही गड्डी खरेदी करतो. इतकी जास्त कोथिंबीर वेळीच वापरली नाही तर सुकून जाण्याची शक्यता असते. एरवी आपण एखाद्या पदार्थाची सजावट करायला किंवा स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीरीचा वापर करतो (Kothimbir Coriander wadi recipe).
कॅल्शियम आणि इतर अनेक घटकांचा उत्तम स्त्रोत असलेली ही कोथिंबीर जास्त प्रमाणात आहारात घेतल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. आता या कोथिंबीरीचे काय करायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर महाराष्ट्रीयन पारंपरीक कोथिंबीर वडी नक्की ट्राय करुन पाहा. बाहेर गारठा असताना हातात चहाचा कप आणि कुरकुरीत-खमंग अशा कोथिंबीर वड्या यांसारखे दुसरे कॉम्बिनेशन नाही. या वड्या करायलाही अतिशय सोप्या असल्याने आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खात असल्याने सकाळच्या नाश्त्याला किंवा ६ वाजता खाऊच्या वेळेला आपण या वड्या करु शकतो. पाहूयात या वड्या करण्याची सोपी-झटपट रेसिपी...
साहित्य -
१. कोथिंबीर - २ वाट्या
२. भाजणी - १ वाटी
३. डाळीचे पीठ - अर्धी वाटी
४. तिखट - १ चमचा
५. हळद - अर्धा चमचा
६. तीळ - २ ते ३ चमचे
७. मीठ - चवीनुसार
८. धणेजीरे पावडर - अर्धा चमचा
९. तेल - ३ वाट्या
कृती -
१. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यायची.
२. यामध्ये थालिपीठाची भाजणी, डाळीचे पीठ घालायचे.
३. त्यात तिखट, हळद, मीठ, तीळ आणि धणेजीरे पावडर घालून सगळे चांगले एकजीव करुन घ्यायचे.
४. यामध्ये अंदाज घेत घेत थोडे थोडे पाणी घालायचे आणि घट्टसर पीठ मळायचे.
५. पीठाचे लांब रोल तयार करुन घ्यायचे आणि ते उकडायला पातेल्यावरील जाळीत किंवा कुकरमध्ये ठेवायचे.
६. उकडलेले हे रोल गार होऊ द्यायचे आणि सुरीने त्याच्या एकसारख्या वड्या कापायच्या.
७. या वड्या कढईमध्ये तेल घालून खरपूस तळून घ्यायच्या.
८. गरमागरम या वड्या चटणी, सॉस किंवा अगदी नुसत्याही चविष्ट लागतात.