Join us  

कोथिंबीर स्वस्त झाली तर नक्की करा खमंग कुरकुरीत ‘कोथिंबीर वडी!’- अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 12:33 PM

Kothimbir Wadi Recipe Authentic Maharashtrian Recipe : तुमच्याकडेही भरपूर कोथिंबीर असेल तर या वड्या नक्की ट्राय करा.

कोथिंबीर एरवी आपण एखाद्या पदार्थावर गार्निश करायला किंवा फारतच पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरतो. पण पावसामुळे कोथिंबीर स्वस्त झाली असल्याने एरवी २० किंवा १५ रुपयांना मिळणारी कोथिंबीरीची गड्डी अवघ्या ५० पैशाला किंवा १ रुपयाला मिळत आहे. त्यात बाहेर थंडगार पावसाळी वातावरण आहे. अशावेळी कोथिंबीरीच्या कुरकुरीत आणि चविष्ट अशा वड्या केल्या तर? ऐकूनही तोंडाला पाणी सुटेल असा हा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ बनवायला फार काही अवघड नसतो आणि अतिशय चविष्टही असतो. त्यामुळे तुमच्याकडेही भरपूर कोथिंबीर असेल तर या वड्या नक्की ट्राय करा. कोथिंबीरीत कॅल्शियम भरपूर असल्याने आरोग्यासाठीही ती अतिशय फायदेशीर असते. पाहूयात या वड्या करण्याची सोपी-झटपट रेसिपी (Kothimbir Wadi Recipe Authentic Maharashtra Recipe)....

साहित्य -

१. कोथिंबीर - २ ते ३ वाट्या 

(Image : Google)

२. भाजणी - १ वाटी

३. डाळीचे पीठ - १ वाटी 

४. तिखट - १ चमचा 

५. हळद - अर्धा चमचा 

६. तीळ - २ ते ३ चमचे

७. मीठ - चवीनुसार 

८. धणेजीरे पावडर - अर्धा चमचा

९. तेल - ३ वाट्या 

कृती -

१. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यायची. 

२. यामध्ये थालिपीठाची भाजणी, बेसन घालायचे. 

३. त्यात तिखट, हळद, मीठ, तीळ आणि धणेजीरे पावडर घालून सगळे चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

४. या पीठाला पाणी सुटते आणि ते थोडे घट्टसर व्हायला मदत होते. 

५. पीठाचे लांब रोल तयार करुन घ्यायचे आणि ते उकडायला पातेल्यावरील जाळीत किंवा कुकरमध्ये ठेवायचे. 

६. उकडलेले हे रोल गार होऊ द्यायचे आणि सुरीने त्याच्या एकसारख्या वड्या कापायच्या. 

७. या वड्या कढईमध्ये तेल घालून खरपूस तळून घ्यायच्या. 

८. गरमागरम या वड्या चटणी, सॉस किंवा अगदी नुसत्याही चविष्ट लागतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.