दुपारच्या डब्याला बहुतांश जण पोळी भाजी नेतात. रात्रीच्या वेळी जेवायला काय करायचं असा तमाम गृहीणींपुढे प्रश्न असतो. परत वेगळी भाजी, आमटी करायला आणि खायलाही नको वाटतं. हेल्दी हवं, सगळ्यांना आवडणारं हवं आणि तरी झटपट होणारं असं काही हवं असेल तर पिठलं हा पारंपरिक पर्याय असतोच. आपण एरवी डाळीच्या पीठाचं म्हणजेच बेसनाचं पिठलं करतो. पण कोकणात कुळथाचं पिठलं केलं जातं. हुलग्यापासून तयार केलं जाणारं कुळथाचं पीठ आणि त्यापासून केलं जाणारं पिठलं हा कोकणी लोकांचा अतिशय आवडीचा आणि खास पदार्थ. भाकरीसोबत आणि गरमागरम वाफाळत्या भातासोबत हे पिठलं खाणं म्हणजे सुखच (Kulith Pithla Horse gram Recipe Traditional Superfood).
बाहेर पाऊस पडत असताना असा बेत एकदा तरी व्हायलाच हवा. कुळथामध्ये आरोग्याला फायदेशीर अनेक घटक असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी आवर्जून कुळीख खायला पाहिजे असे आहारतज्ज्ञ सांगतात. लोह आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असलेले हे कडधान्य महिलां आणि लहान मुलांच्या हाडांसाठी तसेच शरीरातील रक्ताचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. मासिक पाळीचा त्रास कमी होण्यासाठी, मूतखडा किंवा कोलेस्टेरॉलचा त्रास कमी होण्यासाठी कुळीथ फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी, युरीन इन्फेक्शन तसेच मूळव्याधीवरील उपाय म्हणूनही कुळीथ खाण्याचा सल्ला दिला जातो. पारंपरिक पदार्थांतील सूपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुळथाचं पिठलं कसं करायंच पाहूया...
१. साधारण अर्धी ते १ वाटी कुळथाचं पीठ घेऊन त्यात भरपूर पाणी घालून चांगले हलवून घ्यायचे.
२. एकीकडे फोडणीत घालण्यासाठी लसणाच्या पाकळ्या, कडीपत्ता घ्यायचा.
३. पाणी घातलेल्या पीठात आपल्या अंदाजे तिखट आणि मीठ घालायचे आणि एकजीव करुन घ्यायचे.
४. कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी आणि जीरं घालायचं आणि चांगलं तडतडू द्यायचं.
५. मग यात हिंग-हळद घालून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे आणि कडीपत्ता घालायचा.
६. लसूण थोडा लालसर झाल्यावर यामध्ये पाण्यात कालवलेलं पीठ घालायचं आणि अंदाज घेत आणखी पाणी घालायचे.
७. पिठल्याला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि मग बारीक करुन ते चांगले शिजवायचे.
८. शिजल्यानंतर गॅस बंद करुन यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची. घाईच्या वेळी झटपट होणारी रेसिपी आहे.
९. कुळथाचं पिठलं हे घट्टसर करण्यापेक्षा जितकं पातळ करु तितकं जास्त चांगलं लागतं, तसंच हे पीठ शिजल्यावर फुगत असल्याने अंदाज घेऊन पाणी घालत राहायचं.