रोजच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश असतो. असे असले तरीही काहीवेळा त्याच त्या डाळी खाऊन कंटाळा येतो, काहीतरी वेगळं खावंसं वाटत. अशावेळी, चपाती आणि भात या दोन्हींसोबत खाता येईल असा एक पदार्थ आपण बनवतो. डाळीशिवाय ताकाची कढी, सांबार, आमटी, टोमॅटोचे सार असे पदार्थ बनवले जातात, यासोबतच कुळथाची पिठी हा देखील त्यापैकीच एक पदार्थ. खरंतर कुळथाची पिठी अनेकांना आवडत नाही. काहींना तर त्याचा वासही नकोसा वाटतो. परंतु काहींना पिठी इतकी आवडते की, जेवणात चार घास जास्तच जातात(Malvani Kulith Pithi).
गरमागरम भात, चपाती, भाकरी सोबत कुळथाची पिठी खाण्याची मज्जा काही औरच असते. धो - धो कोसळणाऱ्या पावसात अशी गरमागरम पिठी ताटात समोर असली की याहून मोठं सुखः नाही. गरमागरम पिठी, भाकरी, भात सोबत कुरडई किंवा पापड असा झक्कास बेत होऊ शकतो. कुळथाला स्वतःची अशी एक छान चव असल्याने ती पटापट खाऊन फस्त केली जाते. कुळीथ पौष्टिक व आरोग्यासाठी चांगले असल्याने ते आहारात असणे फायदेशीर ठरते. घरातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच कुळीथ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. अस्सल पारंपरिक कुळथाची पिठी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Kulthachi Pithi Recipe).
साहित्य :-
१. कुळथाची पिठी - २ ते ३ टेबलस्पून
२. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून
३. मीठ - चवीनुसार
४. हळद - १/२ टेबलस्पून
५. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
६. धणे पूड - १ टेबलस्पून
७. जिरे पूड - १ टेबलस्पून
८. पाणी - गरजेनुसार
९. तेल - गरजेनुसार
१०. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
११. लसूण - ४ ते ५ पाकळ्या
१२. कोकम - ४ ते ५ पाकळ्या
१३. कोथिंबीर - १ टेबलस्पून
१४. हिंग - १/२ टेबलस्पून
फ्रिजमध्ये ठेवलं तरी आल्याला बुरशी लागते? २ सोप्या ट्रिक्स, आलं टिकेल वर्षभर...
कृती :-
१. सगळ्यातआधी एका भांड्यात कुळथाची पिठी घेऊन त्यात काळीमिरी पूड, हळद, लाल मिरची पावडर, धणे पूड, जिरे पूड, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी घेऊन हे पिठीचे पातळ बॅटर तयार करुन घ्यावे.
२. एका भांड्यात तेल घेऊन ते मंद आचेवर गरम करावे. त्यानंतर त्यात लसूण, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी तयार करून घ्यावी.
३. फोडणी तयार झाल्यावर त्यात तयार केलेले कुळीथ पिठाचे बॅटर ओतावे.
४. आता हे बॅटर जोपर्यंत शिजून थोडे घट्टसर होत नाही तोपर्यंत चमच्याने ढवळत रहावे.
५. त्यानंतर पिठी थोडी शिजून घट्टसर झाल्यावर त्यात कोकम घालावे.
६. पिठीला २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावे.
ना स्टफिंग, ना कणिक मळायची झंझट तरीही झटपट बनवा चविष्ट पनीर पराठा.... गरमागरम पराठा खायला तयार...
गरमागरम पिठी खाण्यासाठी तयार आहे. वरून कोथिंबीर भुरभुरवून पिठी खाण्यासाठी सर्व्ह करावी.