Join us  

फक्त १० मिनिटांत करा कुरकुरीत ‘भेंडी फ्राय‘, भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:15 PM

Kurkuri Bhindi Bhindi Fry Recipe : भेंडीची भाजी कधी गचगचीत होते तर कधी चव बिघडते.  पण जर तुम्ही कुरकुरीत भेंडीची रेसिपी ट्राय केली तर भेंडी न खाणारेही आवडीने ही भाजी खातील.

रोजच्या जेवणाचा कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. (Cooking Tips & Tricks) नेहमी त्याचत्याच भाज्या खाणं नको वाटतं अशावेळी तुम्ही  नेहमीच्या भाज्या वेगळ्या पद्धतीनं बनवून साध्या जेवणाचीही रंगत वाढवू शकता. (Crispy Bhindi Recipe) भेंडीची भाजी सर्वांच्याच घरी खाल्ली जाते. भेंडीची भाजी कधी गचगचीत होते तर कधी चव बिघडते.  पण जर तुम्ही कुरकुरीत भेंडीची रेसिपी ट्राय केली तर भेंडी न खाणारेही आवडीने ही भाजी खातील. कुरकुरीत भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make crispy bhindi) ही भेंडी चपातीबरोबर नाही तर नुसती खायलाही चांगली लागते. 

साहित्य

भेंडी- १ मोठा बाऊल

चण्याचं पीठ- अर्धी वाटी

तांदळाचं पीठ- अर्धी वाटी

कॉर्नफ्लोअर - पाव वाटी

लाल तिखट- २ ते ३ चमचे

लिंबाचा रस - ३ ते ४ टिस्पून

हळद - १ ते २ टिस्पून

मीठ-  चवीनुसार

कृती

१) कुरकुरीत भेंडी बनण्यासाठी सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानं पुसून घ्या आणि पंख्याखाली सुकवा.  भेंडी मधोमध चिरून घ्या. त्यानंतर  ४ बारीक भांगांमध्ये चिरा.

२) चिरलेली भेंडी एका बाऊलमध्ये ठेवा. त्यात चण्याच्या डाळीचं पीठ,  तांदळाचं पीठ, कॉर्न फ्लोअर, रेड चिली पावडर, हळद, मीठ आणि लिंबू घालून एकजीव करून घ्या. 

३) त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल तापल्यानंतर त्यात भेंडीचे काप सोडा आणि  सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.  यावर चाट मसाला घालून सर्व्ह करा. 

भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करावं?

भेंडीच्या  भाजीत म्यूसिलेज नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे भाजी स्टिकी होते. एलोवेरामध्येही हा पदार्थ दिसून येतो. हा पदार्थ भेंडीच्या बियांच्या निर्मीतीसाठी मदत करतो. त्यामुळे भेंडी चिकट असते.  कधीही भाजी बनवाना भेंडी धुतल्यानंतर लगेच चिरू नका अन्यथा भेंडी चिकट होईल. भेंडी सुकवा त्यानंतर चिरा.  भेंडी बनवण्याच्या २ ते ३ तास आधीच धुवून ठेवा. भेंडीमध्ये लिंबाचा रस किंवा दही अशा पदार्थांचा वापर करा. भेंडी अगदी बारीक न चिरता मोठ्या तुकड्यांमध्ये कापून तेलात शेलो फ्राय करून घ्या. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नपाककृती